जिल्ह्यातील विविध भागातून तापाच्या आजाराचे रुग्ण शहरी भागात उपचारार्थ येत आहेत. मात्र डेंग्यूच्या धास्तीने साधा तापही असल्यास अनेकजण धास्ती घेत आहेत. आता प्रशासनाने दखल घेतल्यामुळे जनजागृती झाल्यास ही भीती कमी होईल. हिंगोली : /जिल्ह्यात /डेंग्यूने पाय पसरू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्याच्या सूचना प्रभारी जिल्हाधिकारी राम गगरानी यांनी दिल्या. दर शनिवारी कोरडा दिवस पाळण्यात येणार असून यासाठी योग्य नियोजन न केल्यास व यापुढे डेंग्यूची साथ आढळल्यास कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत घेण्यात आलेल्या बैठकीस जिल्हा परिषदेच्या आरोग्य, पंचायत, महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकार्यांसह जिल्हा शल्य चिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी, पालिका मुख्याधिकारी आदींची उपस्थिती होती.जिल्हाधिकार्यांनी आरोग्य विभागाकडून विविध ठिकाणच्या साथीच्या आजाराच्या घटनांचा आढावा घेतला. तसेच केलेल्या उपाययोजना व भविष्यात हे प्रकार टाळण्यासाठी करायच्या उपाययोजनांवर चर्चा केली. माझोड, वटकळी व पिंपळदरी येथे डेंग्यूमुळे रुग्णाचा बळी गेला आहे. त्यामुळे अशा गावांत सर्व नागरिकांच्या रक्तनमुन्यांची तपासणी केली पाहिजे. घरोघर जावून तेथे तपासण्या करण्याची सूचनाही केली. तसेच कुठेही ताप अथवा डेंग्यूसदृश्य तापाचे रुग्ण असल्याची तक्रार आल्यास ती गांभीर्याने घेण्यासही बजावले. अशा गावांत आरोग्य विभागाने तपासणी करावी. प्रतिबंधात्मक उपायांसाठी जि. प. चा पंचायत विभाग, पालिका अथवा संबंधित यंत्रणांना सतर्क करण्यास सांगण्यात आले. या विभागांनीही स्वच्छता, पाणीपुरवठा आदी बाबी तपासून संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारी घेण्यास सांगण्यात आले. तर जिल्ह्यात डेंग्यूचा धोका लक्षात घेता धूरफवारणी, दर शनिवारी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहनही करण्यात आले. यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्यास त्यांनी सांगितले. डेंग्यूच्या साथीचे राज्यभरातील परिणाम लक्षात घेता सतर्कतेच्या सूचनाही दिल्या.याच बैठकीत स्वच्छ भारत अभियान ग्रामीणमध्ये वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी नव्याने आलेल्या परिपत्रकानुसार १२ हजारांचे अनुदान मिळत असल्याचे सांगून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले. परिसर स्वच्छतेमुळेही अनेक आरोग्य समस्या टाळता येतात