रस्त्यावरील साहित्याने रहदारीस अडचण
परभणी : शहरातील गव्हाणे चौकातून जिंतूर रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही व्यावसायिकांनी दुकानातील साहित्य दुकानांसमोर ठेवले आहे. त्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. शिवाय काही लाकूड व्यापाऱ्यांनीही त्यांचे साहित्य रस्त्यालगत ठेवले आहे.
पाण्याअभावी झाडे सुकू लागली
परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लावण्यात आलेली झाडे पाणी नसल्याने सुकू लागली आहेत. महसूल विभागाने या झाडांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ज्या हेतूने ही झाडे लावली होती तो हेतू फोल ठरताना दिसत आहे.
महावितरणमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
बोरी : येथून जवळच असलेल्या नागठाणा येथील शेतकऱ्यांनी वीज बिल भरूनही महावितरणने त्यांचा वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित केल्याने गहू, हळद, काकडी, आद्रक आदी पिकांना पाणी देता येत नाही.
मोफत पाणपाेईचे परभणीत लोकार्पण
परभणी : शहरातील वसमत रोड भागातील दत्तधाम येथे मराठा शिवसैनिक सेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोफत पाणपोई सुरू करण्यात आली आहे. यावेळी सुनील आवचार, जीवन स्वामी, अफसर खान आदी उपस्थित होते.
पोलिसांतील गुन्हे परत घेण्याची मागणी
परभणी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी नानाभाऊ पटोले युवा मंचच्यावतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.