उद्धव चाटे /गंगाखेड
दोन वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या छायेत आहे. याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. अल्प पावसामुळे पाण्याचे साठे कमी झाले. परिणामी रबी हंगाम संकटात सापडला आहे.
गंगाखेड तालुक्यात रबी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ३४0 हेक्टर आहे. ३१ ऑक्टोबरअखेर केवळ २हजार १५६ हेक्टरवर पेरणी झाली. यामध्ये रबी ज्वारी १हजार १२ हेक्टर, गहू ८९हेक्टर, मका ५ हेक्टर, हरभरा १ हजार ५हेक्टर, करडई ३५ हेक्टर आणि इतर पिके १0 हेक्टरमध्ये पेरले आहेत. तालुक्यात रबी हंगामामध्ये तृण धान्य, कडधान्य व गळित धान्याच्या पेरणीचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे आपल्या पोटाची खळगी कशी भरणार, या विंवचनेत शेतकरी सापडला आहे. शेतकर्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून बँकेचे पीक कर्ज, सावकाराचे पीक कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे. तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून खरीप हंगामात काहीच हाती लागले नाही आणि रबी हंगामाचीही पेरणी पाणी नसल्याने घटली आहे.