सोनपेठ : शहरात सध्या चिकुनगुनियाच्या साथीचा फैलाव झाला आहे. अनेकांच्या घरात या आजाराचे रुग्ण दिसत आहेत. ही साथ बळावू नये म्हणून आरोग्य विभाग व नगरपालिकेने मात्र कुठलीही उपाययोजना केलेली नाही.
गेल्या एक आठवड्यापासून शहरात चिकुनगुनियाची साथ पसरली आहे. ताप, थंडी, डोकेदुखी व सांधे दुखीचे अनेक रुग्ण रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. शहरात साथ सुरु असतानाही आरोग्य विभाग व नगरपालिका लक्ष देण्यास तयार नाही. या आजारामुळे रुग्ण सांधे दुखने जायबंदी होत आहेत. अनेक गरीब रुग्णांना महागडी औषधी घ्यावी लागते. चिकुनगुनिया या आजारावर वेळीच व योग्य उपचार न झाल्यास रुग्णांना डेंग्यू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या साथीच्या प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाने मोहीम उघडण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
■ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन वैद्यकीय अधिकारी असून एकाकडे जिल्हा मलेरिया निर्मूलन अधिकार्याचा पदभार देण्यात आला आहे. तर शेळगावच्या महिला डॉक्टरची येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारीपदी तात्पुरती नियुक्ती केली आहे. रात्रीच्या वेळी एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने रुग्णांना खाजगी दवाखान्यात महागडा उपचार घ्यावा लागत आहे.