वसमत : तहसीलदारांनी दिले आश्वासन
वसमत : तालुक्यातील हयातनगर ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी वसमत येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. बुधवारी तहसीलदार अरविंद नरसीकर यांनी उपोषणार्थिंसोबत चर्चा करुन समस्या निवारण करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले.
हयातनगर येथील २00 ग्रामस्थ मंगळवारी उपोषणास बसले होते चुकीची आणेवारी, तलाठय़ाचे मुख्यालयी न राहणे, गारपीट अनुदान अन्नसुरक्षा यादीचा घोळ आदी मुद्यावर हे उपोषण प्रारंभ करण्यात आले होते. बुधवारी सकाळीच वसमतचे तहसीलदार अरविंद नरसीकर, नायब तहसीलदार राजेंद्र गळगे, मंडळाधिकारी कुरुंदकर आदीनी उपोषणार्थींसोबत चर्चा केली. मुख्यालयी न राहणार्या तलाठय़ास नोटीस देण्यात येणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले.
इतर मागण्यांवरही समाधानकारक कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आल्याने ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. यावेळी रुस्तुमराव सारंग, गोरख पाटील, खाडे, कहाने, विष्णू अंभोरे, शंकर राहटीकर, लक्ष्मण सारंग, पांचाळ, सारंग आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)