जीवा सेनेच्या अध्यक्षपदी भोसले
पूर्णा : अखिल भारतीय जीवा सेनेच्या पूर्णा तालुकाध्यक्षपदी सोमेश्वर भोसले यांची निवड करण्यात आली आहे. या संघटनेची अन्य कार्यकारिणी अशी- सचिव बाजीराव वाघमारे, कार्याध्यक्ष अंबादास सूर्यवंशी, उपाध्यक्ष गैभी भालेराव, सहसचिव राजू भालेराव, कोषाध्यक्ष काशीनाथ वाकळे, संघटक गोविंद भालेराव. नूतन पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष राम सूर्यवंशी नियुक्तीपत्र दिले.
खंडाळी येथे उद्घाटन कार्यक्रम
खंडाळी : गंगाखेड तालुक्यातील खंडाळी येथे मुख्य रस्त्यावर विकेल ते पिकेल या अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या भाजीपाला केंद्राचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी एस. व्ही. मस्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डी. डी. पटाईत, रोहिदास शिंदे, गोविंद शिंदे, शिवाजी भाेसले, ज्ञानोबा पवार, नामेदव जंगले, सोमनाथ पवार उपस्थित होते.
अंगणवाड्यांना जिंतूरमध्ये पाणी नाही
परभणी : जिंतूर तालुक्यात एकूण ३१६ अंगणवाड्या आहेत. यापैकी एकाही अंगणवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे येथील मुलांना पाण्यासाठी हातपंप किंवा सार्वजनिक विहिरीवर जावे लागते. सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
भिंत पाडणाऱ्यांवर कारवाईची मागणी
परभणी : येथील प्रशासकीय इमारतीच्या दोन्ही प्रवेशद्वारांसमोरील भिंत काही व्यक्तींनी पाडली आहे. त्यामुळे शासनाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी व त्यांच्याकडून यासाठीचा खर्च वसूल करावा, अशी मागणी होत आहे.
रेल्वेस्थानकावर दिव्यांग, वृद्धांची गैरसोय
परभणी : येथील रेल्वेस्थानकावर दिव्यांग व वृद्धांची मोठी गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्थानकाच्या एका कडेला एक्सलेटर व लिफ्ट बसविण्यात आली आहे. वर्दळीच्या ठिकाणी लिफ्ट व एक्सलेटर बसविणे आवश्यक होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
पिण्याच्या पाण्याच्या सुविधेची मागणी
परभणी : विविध कामानिमित्त जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. येथे काही वर्षांपूर्वी वॉटर मशीन बसविण्यात आली होती. परंतु, देखभाल दुरुस्तीअभावी ती बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे यावरील खर्च वाया गेला आहे.
प्रवेशद्वार बंद केल्याने वाहतुकीचा खोळंबा
परभणी : येथील जिल्हा परिषदेत जाण्यासाठी दुसऱ्या बाजुला असलेले प्रवेशद्वार बंद केल्याने एकाच प्रवेशद्वारातून येताना वाहतुकीचा खोळंबा होत आहे. विशेष म्हणजे प्रमुख पदाधिकारी व अधिकाऱ्यांची वाहने रस्त्यात उभी राहात आहेत.