नामदेव बिचेवार /बारड |
कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळवावे याचा वस्तूपाठ बारड येथील युवा शेतकरी माणिक नरसिंगराव लोमटे यांनी एकरी ८५ टन विक्रमी ऊस उत्पादन घेवून सर्वांसमोर ठेवला आहे. बारड परिसरातील शेतजमीन उपजावू मानली जाते. त्यास जिद्द व मेहनतीची जोड देत लोमटे यांनी ऊस पिकांची शेतात नियोजन पद्धतीने लागवड करून एकरी ८५ टनांचे विक्रमी उत्पन्न काढले. विक्रमी उत्पादन देणारा हा उसाचा फड बारड परिसरात लक्षवेधी ठरला आहे. सुरुवातीस शेतीची पूर्ण मशागत करून ऊस लागवडीचे नियोजन करण्यात आले. यामध्ये ऊस बेने ३१0२ याची लागवड करण्यात आली. सरी पद्धतीने पाच बाय पाच अंतरावर दोन डोळे, ऊस बेण्याची लागवड केली होती. ऊस पिकांच्या उगवणीनंतर २0 ते २५ दिवस रासायनिक खताचा पहिला डोस वापरण्यात आला. यामध्ये दोन डीएपी, एक पोटॅश, २५ किलो युरिया, बेरोकॉल ११- १५ किलो, सॅटराईड एक बॅग ५0 किलो याप्रमाणे टाकण्यात आला. दर दहा दिवसांनी पाणी नियोजन राणपाणी देण्यात आले. ऊसावडील कीड, माशी, पांढरी माशी या रोगापासून नियंत्रणासाठी दीड महिन्याच्या कालावधीनंतर मिकसेल औषधी फवारणी करण्यात आली होती. ६0 दिवसांच्या अंतरावर दोन बॅग युरिया, दोन बॅग पोटॅश टाकण्यात आला. पुन्हा मिसेल १६ या औषधाची एक किलो बॅगची पाण्याची मिसळून दुसरी फवारणी करण्यात आली. १00 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उसास एकरी दोन डीएपी, एक पोटॅश, पंचवीस किलो बेरोकॉल ११, सॅटराईट एक बॅग रासायनिक खत वापरण्यात आला. ऊस पिकाची निंदन खुरपणी दोन वेळा करण्यात आली. या नियोजनाने उसाचे पीक जोमाने आले असून एका बुडास २२ उसाचे फुटवे असून २८ कोड्यांचा ऊस आहे. गोलार्दमध्ये पण ऊस चांगला भरला आहे. एका उसाचे वजन सात किलोपर्यंत आहे. एका एकर उस लागवडीचा पूर्ण खर्च २५ हजार रुपये झाला असून उसाचे एकरी ८५ टनाचे विक्रमी उत्पन्न मिळाले असून कारखाना भाव दोन हजार रुपये प्रति टन आहे. या प्रमाणे उत्पन्न काढले असता १ लाख ७0 हजार रुपये एकरी मोबदला मिळतो आहे. कमी खर्चात जास्त मोबदला मिळवता येईल. शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करण्यापासून ते देखभाल करण्याबाबत ए.बी. सय्यद यांनी वेळोवेळी उसाच्या फडास भेट देवून मार्गदर्शन केले. ३१0२ या उसाच्या जातीचा उस बेण्यास मोठय़ा प्रमाणात मागणी असून बेण्यासाठी तीन हजार रुपये प्रति टन विक्री केली जात असून उत्पन्न वाढीत भर पडल्याची माहिती शेतकरी माणिक लोमटे यांनी दिली. परिसरात लोमटे यांच्या उसाच्या विक्रमी फडाची चर्चा असून हे पाहण्यासाठी शेतकर्यांनी गर्दी केली आहे. युवक शेतकर्यास शेती व्यवसाय करण्यासाठी हा उसाचा फड प्रोत्साहन देत आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न उद्योगाशी संलग्न शेती व्यवसाय युवक करीत आहेत. |