गुरुजींनी विद्याथ्र्याना विचारलं,
‘राग आला की आपण ओरडतो का? भांडण सुरू झाले की संतापून रागरागानं, तावातावानं लोकं का बोलत असतील? काय वाटतं तुम्हाला?’
बराच विचार करून एकजण म्हणाला,
‘डोकं तापतं ना आपलं, राग येतो, त्या रागामुळे आपण ओरडतो.’
‘पण ओरडतो का? ज्याचा राग आला, संताप झाला, तो माणूस तर तिथे तुमच्या जवळ, तुमच्या बाजूला, समोरच असतो ना. मग शांतपणो सांगितलं जे सांगायचं ते तरी चालेल, ओरडायचं कशाला?’ - गुरुजींनी पुन्हा विचारलं.
कुणी काय कुणी काय उत्तरं दिली, पण गुरुजींचं तेच की, ओरडतो कशाला?
कुणाकडे काहीच उत्तर नाही म्हटल्यावर त्यांनीच सांगितलं.
‘जेव्हा माणसांना एकमेकांचा राग येतो ना, तेव्हा ते शरीरानं एकमेकांच्या अवतीभोवती असले तरी त्यांची मनं मात्र दुरावलेली असतात. त्यातलं अंतर वाढलेलं असतं. ते अंतर सांधायचं, त्यातून आपलं म्हणणं वाट काढत समोरच्यार्पयत पोहचवायचं म्हणून ते मोठय़ानं बोलतात. राग वाढतो, भांडण वाढतं, तसं मनातलं अंतर वाढतं. म्हणून मग अजून आरडाओरडा सुरू होतो. रागाची पट्टी वाढते.’
एवढं सांगून गुरुजी थांबले. मग पुन्हा त्यांनीच विचारलं.
‘माणसं प्रेमात पडतात, तेव्हा काय होतं?’
‘ते एकमेकांच्या अंगावर ओरडत नाहीत, हळूच बोलतात. कुजबुजतात. तरी त्यांचं म्हणणं एकमेकांना कळतं. कारण त्यांची मन जवळ आलेली असतात. अंतर कमी झालं की आवाज कमीच होतो.’
आणि एक स्टेज अशी येते की, जिथं खूप प्रेम असतं तिथं काही बोलावंही लागत नाही. एका नजरेत जे बोलायचं ते बोलून होतं. पुढच्या वेळेस रागानं ओरडाल तेव्हा हे एवढं लक्षात ठेवा.’
- एका फॉरवर्ड गोष्टीचा इंग्रजी अनुवाद