लंडन : आॅलिम्पिक चॅम्पियन आणि विश्व विक्रमी धावपटू जमैकाचा उसेन बोल्ट याने शनिवारी डायमंड लीगमध्ये १०० मीटर दौड जिंकून मैदानावर यशस्वी पुनरागमन केले. लंडन आॅलिम्पिक स्टेडियममध्ये २८ वर्षांच्या बोल्टने ९.८७ सेकंद विक्रमी वेळेसह दौड जिंकली होती. त्याआधी हिटदेखील याच वेळेसह जिंकली. अमेरिकेचा मायकेल रॉजर्स ९.९० सेकंदांसह दुसऱ्या व जमैकाचा केमर बेली कोल ९.९२ सेकंदांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. बोल्टने सहा आठवड्यात पहिल्यांदा १०० मीटरमध्ये भाग घेतला. याआधी त्याने ब्राझीलमध्ये १०.१२ सेकंदाची निराशाजनक कामगिरी केली होती. या मोसमात १०० मीटरमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी अमेरिकेचा जस्टिन गॅटलिन याने केली आहे. त्याने ९.७४ सेकंद वेळेची नोंद केली. पुढील महिन्यात बीजिंगमध्ये विश्व चॅम्पियनशिपचे आयोजन होत असून, यावेळी बोल्ट व गॅटलिन यांच्यातील चुरस रंगले.‘मी नंबर वन आहे आणि नेहमी नंबर वन राहणारच! निवृत्त होईपर्यंत माझे हेच डावपेच असतील. पावसामुळे मैदान निसरडे झाले होते, तरीही हिटमध्ये आणि फायनलमध्ये मी सारखीच वेळ नोंदविली, हीच खरी जादू म्हणावी लागेल.’- उसेन बोल्ट, धावपटू जमैका
उसेन बोल्टचे विजयी पुनरागमन
By admin | Updated: July 26, 2015 01:52 IST