कोलंबो : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू झहीर अब्बास यांना श्रीलंका संघ पाकिस्तान दौऱ्यावर येईल, अशी आशा आहे. झिम्बाब्वे दौऱ्याच्या यशस्वी आयोजनानंतर अन्य देशांच्या संघांचे यजमानपद भूषविण्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्ड उत्सुक असल्याचे अब्बास म्हणाले.मार्च २००९ मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कुठल्याच संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही, पण यंदा झिम्बाब्वेने दोन टी-२० आणि तीन आंतरराष्ट्रीय वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. हा दौरा म्हणजे पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन असल्याचे मानल्या जात आहे. अब्बास म्हणाले, ‘शेजारी देश पाकिस्तान दौऱ्यावर येतील, असे दिवस लवकरच अनुभवाला मिळेल. श्रीलंका संघ पाक दौऱ्यावर येईल, अशी आशा आहे. आम्ही प्रत्येक विभागात एकमेकांच्या जवळ असून, पाकिस्तानला जर यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली तर मला निश्चितच आनंद होईल. मी उघडपणे यासाठी प्रयत्न करू शकत नाही. पण आयसीसी सदस्यांसोबत चर्चा करून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करू शकतो.’झहीर अब्बास पुढे म्हणाले, ‘झिम्बाब्वे संघाने पाकिस्तानचा दौरा करणे चांगला बदल आहे. पण केवळ पाकिस्तानच्या यजमानपदाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेट का खेळल्या जात नाही. श्रीलंकेतील परिस्थिती चांगली नसताना आम्ही तेथे क्रिकेट खेळलो. पाकिस्तानातील क्रिकेट संपविण्याचा प्रयत्न होणे चुकीचे आहे. त्यामुळे काहीच चांगले निष्पन्न होणार नाही. आमचे काम सर्व जगात क्रिकेटचा प्रसार करणे असून, त्यासाठी आम्ही नव्या सदस्यांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’कॉलिन काऊड्रे आणि क्लाईड वॉलकॉट यांच्यानंतर आयसीसीचे अध्यक्षपद भूषविणारे झहीर अब्बास तिसरे क्रिकेटपटू आहेत. अब्बास सध्या श्रीलंका क्रिकेटच्या अंतरिम समितीच्या आमंत्रणानंतर सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहेत. त्यांनी पाकिस्तान-श्रीलंका मालिका बघितली.’ पाकिस्तानच्या युवा संघाने चमकदार कामगिरी केली. (वृत्तसंस्था)
श्रीलंका संघ पाकचा दौरा करेल : झहीर अब्बास
By admin | Updated: July 28, 2015 01:38 IST