कोलकता : बॉलिवूड सुपरस्टार आणि कोलकता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान याने आयपीएल-७ च्या एलिमिनेटर लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबवरील आपल्या संघाच्या शानदार विजयाचा आनंद पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बरोबर साजरा केला. विजयानंतर शाहरुख खान हरीश चटर्जी स्ट्रीटस्थित मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानावर ममता बॅनर्जी यांची भेट घेण्यासाठी पोहोचला. तेथे त्याची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेट रसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निवासस्थानी बाहेर येऊन किंग खानचे स्वागत केले आणि शाहरुख खाननेही ममतांचे आशीर्वाद घेतले. ममता बॅनर्जी यांनी फेसबुकवर लिहिले, ‘पश्चिम बंगालचा ब्रँड अॅम्बेसेडर शाहरुख खान याचा आम्हाला गर्व आहे. कोलकताला शानदार विजय मिळाला आहे. कोलकता संघाचे अभिनंदन आणि फायनलसाठी शुभेच्छा. सामना संपल्यानंतर शाहरुख माझ्या घरी आला. तो एक चांगला क्षण होता. शाहरुख आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाला माझ्यातर्फे शुभेच्छा.’ ममता बॅनर्जीदेखील सामना पाहण्यासाठी ईडन गार्डनवर काही वेळासाठी आल्या होत्या. किंग खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरही त्याचे ममता बॅनर्जींबरोबरचे छायाचित्र पोस्ट केले आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, माझ्या केकेआर संघाने सुंदर खेळ दाखवला. मी ममता दीदींसोबत फिश फ्राय खाल्ली आणि कोलकता संघाच्या विजयाचा आनंद साजरा केला. (वृत्तसंस्था)
शाहरुखने केला विजयाचा आनंद साजरा
By admin | Updated: May 30, 2014 04:21 IST