रिओ : रिओ आॅलिम्पिक सुरू होण्यास आता बरोबर एक वर्ष शिल्लक आहे. आयोजन समितीने सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करीत या स्पर्धांचे शानदार आयोजन करण्याचे क्रीडाप्रेमींना वचन दिले आहे. रिओ शहराचे महापौर एडुआर्डोे पेस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की सर्व निर्माणकार्य वेळेच्या आत संपेल. केवळ १२ महिन्यांचा अवधी शिल्लक असल्याने काहींना काम पूर्ण होणार की नाही, याची चिंता वाटते; पण ठरलेल्या वेळेत हे काम पूर्ण होईल, याची मी ग्वाही देतो. ५ आॅगस्ट २०१६ रोजी आॅलिम्पिकची क्रीडाज्योत रिले संपणार आहे. त्यानंतर क्रीडाज्योत माराकाना स्टेडियममध्ये उद्घाटनाच्या वेळी प्रज्वलित केली जाईल.रिओ आॅलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष कार्लोस जुनमेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आॅलिम्पिकमध्ये २०६ देश सहभागी होणार असून त्यांत सर्वांत नवीन देश साऊथ सुदान असेल. १७ दिवस चालणाऱ्या या क्रीडाकुंभात १०,५०० खेळाडू ४२ क्रीडाप्रकारांत पदकांसाठी चढाओढ करतील. दक्षिण अमेरिकेत होणारे हे पहिले आॅलिम्पिक आहे. या आयोजनाद्वारे ब्राझीलकडे भ्रष्टाचार तसेच आर्थिक संकटाचा डाग पुसून काढून नवी ओळख निर्माण करण्याची मोठी संधी असेल. पेस यांच्यानुसार आॅलिम्पिक पार्कमध्ये ८२ टक्के तयारी पूर्ण झाली. क्रीडाग्रामदेखील ८९ टक्के आकाराला आले आहे. (वृत्तसंस्था)
रिओ आॅलिम्पिकचे ‘काऊंटडाऊन’ सुरू
By admin | Updated: August 6, 2015 22:58 IST