नवी दिल्ली : पंजाबातील गुरुदासपूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यावर सोमवारी सकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने पाकिस्तानला कठोर शब्दांत इशारा देत भारतीयांची सुरक्षा धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्यास क्रिकेट संबंध बहाल होऊ शकणार नाहीत, असे खडे बोल सुनावले आहेत.बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी हल्ल्यानंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सांगितले की,‘ भारतीय लोकांची शांतता आणि सुरक्षा भंग केल्यास कुठल्याही प्रकारचे क्रिकेट संबंध बहाल होऊ शकणार नाहीत हे पाकने समजून घ्यावे. क्रीडा हे वेगळे क्षेत्र आहे हे समजू शकतो पण देशवासीयांची सुरक्षा देखील सर्वतोपरी आहे. सुरक्षेशी कुठल्याही प्रकारचा समझोता करणार नाही. बार्बाडोस येथे माझी पीसीबी प्रतिनिधींसोबत चर्चा झाली. बीसीसीआय वार्ता करण्यास तयार आहे पण देशाचा आणि देशवासीयांच्या सुरक्षेचा मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा असेल.’आयसीसीच्या भविष्यकालीन दौऱ्यात भारत- पाक मालिकेचे आयोजन संयुक्त अरब अमिरात येथे करण्याचे प्रस्तावित आहे. दोन कसोटी आणि पाच वन डे सामन्याचे आयोजन करण्याचा आयसीसीचा विचार आहे. उभय देशांत २००७ साली अखेरचा कसोटी सामना खेळला गेला होता. सोमवारच्या हल्यानंतर बीसीसीआयने स्पष्ट केले की आम्ही पाकसोबत खेळण्याविरुद्ध नाही. पण त्याआधी नागरिकांची सुरक्षा तसेच अंतर्गत शांतता यांची खात्री मिळणे आवश्यक आहे.’(वृत्तसंस्था)
पाकिस्तानसोबत क्रिकेट संबंध नकोत!
By admin | Updated: July 28, 2015 01:43 IST