नवी दिल्ली : सीमेपलिकडून सातत्याने होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे पाकिस्तानासोबत क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचे माजी कर्णधार सौरव गांगुली याने समर्थन केले आहे.गांगुली म्हणाला की, बीसीसीआयचे मत बरोबर आहे. जो पर्यंत दहशतवाद थांबत नाही, तोपर्यंत दोन्ही देशांत क्रिकेट खेळवण्यात येउ नये. दोन्ही देशांत क्रिकेट सुरू होण्याआधी दहशतवाद थांबावा. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशादरम्यान होणारी मालिका ही नेहमीच मनोरंजक आणि रोमांचक असते, मात्र त्यामुळे दहशतवादामुळे पीडित झालेल्या लोकांचे दु:ख दूर होत नाही.गांगुली म्हणाला की, आता बराच वेळ झाला आहे. आम्ही २००४ मध्ये पाकिस्तानात वन डे क्रिकेट खेळलो होतो. तेव्हा संघाचा कर्णधार होतो. ही मालिकाही १५ वर्षांनंतर खेळली गेली होती. स्पॉट फिक्सींगच्या आरोपांतून मुक्त केलेला क्रिकेटपटू एस.श्रीसंत याला बीसीसीआयकडूनही बंदी उठवली जाईल, अशी आशाही गांगुली याने व्यक्त केली. गांगुली म्हणाला की, दिल्ली न्यायालयाने आरोपांतून श्रीसंतला मुक्त केले आहे. तसेच बीसीसीआयने म्हटले की, दंडात्मक कारवाई मात्र सुरूच राहील. मात्र बोर्ड आणि श्रीसंत यांच्यात याबाबत नक्कीच चर्चा होईल, असेही गांगुली म्हणाला. सचिन तेंडुलकर व व्ही.व्ही.एस. लक्ष्मण सोबत बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीत सदस्य असलेला गांगुली भारतीय क्रिकेटमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनांवर खूश आहे.
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच : गांगुली
By admin | Updated: July 29, 2015 02:29 IST