मुंबई : लाईट, कॅमेरा आणि फुटबॉल... असाच काही झगमगाट इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) निमित्ताने गुरुवारी मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पाहायला मिळाला. या झगमगत्या रंगमंचावर केवळ बॉलिवूड नव्हे, तर क्रिकेटस्टारही अवतरले होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, बॉलिवूडस्टार जॉन अब्राहम, रणबीर कपूर, अभिषेक बच्चन, वरुण धवन यांच्यासह उद्योगविश्वातील प्रमुख चेहऱ्यांच्या उपस्थितीत आयएसएलच्या लोगोचे अनावरण झाले आणि भारतीय फुटबॉलच्या नव्या अध्यायाचे बिगुल वाजले. आयएसएलमुळे भारत फुटबॉल विश्वात स्वत:चा दबदबा नक्की निर्माण करेल, असा विश्वास प्रत्येकाने व्यक्त केला. १२ आॅक्टोबर ते २० डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. भारतीय संघ फुटबॉल वर्ल्डकपमध्ये खेळण्याचे स्वप्न आम्ही पाहिले आहे, या स्पर्धेच्या निमित्ताने ते पूर्ण करण्याचे आवाहन या वेळी आयएमजी रिलायन्सच्या प्रमुख आणि आयएसएलच्या संस्थापक नीता अंबानी यांनी सर्व संघमालकांना केले. मुंबई, गोवा, पुणे, चेन्नई, कोलकता, दिल्ली, कोची आणि उत्तर पूर्व अशा एकूण आठ संघांचा समावेश या स्पर्धेत आहे. या लोगोच्या अनावरण सोहळ्यात रणबीर कपूर (मुंबई संघ), सचिन तेंडुलकर (केरळ ब्लास्टर), अभिषेक बच्चन (चेन्नई संघ), समीर मनचंदा (दिल्ली डायनामोस), जॉन अब्राहम (नॉर्थ इस्ट युनायटेड), कपिल वाधवान (एफसी पुणे सिटी), वरुण धवन (गोवा संघ) आणि उत्सव पारेख (अॅलटेटिको दी कोलकता) या संघ मालकांची उपस्थिती होती. या वेळी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीही उपस्थिती लावली.आयोजक नीता अंबानी या वेळी म्हणाल्या, की आजचा हा दिवस ऐतिहासिक आहे. आम्ही एका सामाजिक उपक्रमाकरिता उत्तराखंड येथे गेलो होतो. तेथे अनेक मुलांना भेटलो आणि त्यांना काय हवे असे जेव्हा आम्ही विचारले, त्या वेळी त्यांनी बूट आणि फुटबॉल द्या, आम्हाला पुन्हा फुटबॉल खेळायला सुरुवात करायची आहे, असे उत्तर दिले. त्याच वेळी आम्ही या खेळासाठी काहीतरी करायचे आहे, असा निर्धार केला आणि तो आयएसएलच्या माध्यमातून आम्ही अस्तित्वात उतरवला आहे. प्रत्येक मुलाला क्रीडा आणि शिक्षण हे आवश्यक आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
फुटबॉलच्या नव्या अध्यायाचे बिगुल वाजले
By admin | Updated: August 29, 2014 01:40 IST