ब्रिस्टॉल : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अपयशी ठरलेल्या भारतीय संघाची सोमवारपासून वन-डे ‘कसोटी’ सुरू होणार आहे. कसोटीतील पराभव माघारी टाकून वन-डेमध्ये चमकदार कामगिरी करण्याचे लक्ष्य धोनी ब्रिगेडवर असणार आहे. सराव सामन्यात मिडलसेक्स संघावर मिळवलेला विजय ही भारतासाठी एकमेव जमेची बाब असेल. या विजयाने भारतीय संघाच्या खचलेल्या आत्मविश्वासाला थोड्या प्रमाणात आशेची उभारी मिळाली आहे. कसोटी अपयशानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वावर सडकून टीका झाली. विराट कोहलीचा ‘फॉर्म’ ही संघासाठी ठरलेली सर्वांत मोठी डोकेदुखी असून, वन-डेत तरी त्यावर उतारा मिळेल अशी अपेक्षा आहे. २०१५ची वर्ल्डकप स्पर्धा लक्षात घेता भारतासाठी हा दौरा फार महत्त्वाचा होता आणि त्यादृष्टीने संघबांधणीही केली होती. कसोटीत याचा फारसा फायदा झाला नाही. कोहलीसह स्टुअर्ट बिन्नी, रहाणे, शिखर धवन, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन हे कागदी वाघ ठरले. दुसरीकडे इंग्लंड भारतीय संघाला पुन्हा पराभूत करण्यास उत्सुक आहे. अॅलेस्टर कुक, गॅरी बॅलन्स, इयान बेल, जोस बटलर यांची बॅट खोऱ्याने धावा करण्यास उत्सुक आहे. स्टुअर्ट ब्रॉड याला वन-डेत विश्रांती देण्यात आली असली तरी जेम्स अॅण्डरसन, स्टीवन फिन, क्रिस जॉर्डन हे गोलंदाजीची धुरा सांभाळण्यास सक्षम आहेत. त्यामुळे त्यांना वन-डेतही कसोटीची पुनरावृत्ती अपेक्षित आहे. (वृत्तसंस्था)
भारताची आता वन-डे ‘कसोटी’!
By admin | Updated: August 25, 2014 02:31 IST