नवी दिल्ली : पॉल वॅन अॅस यांच्या जागी नुकताच भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झालेले संघाचे उंच्च कामगिरी संचालक रोलँट ओल्टमेन्स यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ जुलै पासून सुरु होणाऱ्या युरोप दौऱ्यावर भारतीय संघ रवाना होईल. प्रशिक्षक म्हणून भारतीय संघासोबत रोलँट यांचा हा पहिलाच दौरा असेल.१४ आॅग्स्ट पर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यामध्ये भारतीय संघ फ्रान्स आणि स्पेन विरुध्द सामने खेळेल. यंदाच्या वर्षाअखेरीस होणाऱ्या एचआयएफ विश्व हॉकी लीग फायनलची पुर्व तयारी म्हणून या दौऱ्याकडे पाहण्यात येत आहे. दरम्यान, या दौऱ्यामध्ये भारतीय संघ फ्रान्स विरुध्द २ तर स्पेन विरुध्द ३ सामने खेळणार आहे. शिमला जवळील शिलारु येथे सुरु असलेल्या सराव शिबिरातून १९ जुलैला भारतीय संघाची निवड करण्यात आली असून कर्णधारपदाची जबाबदारी सरदार सिंगकडे सोपविण्यात आली आहे, तर उपकर्णधारपदी पी. आर. श्रीजेश याची निवड करण्यात आली आहे.या दौऱ्यासाठी संघ समतोल व पुर्ण तंदुरुस्त असून संघामध्ये दोन गोलरक्षक, सहा बचावपटू, सहा मध्यरक्षक आणि सात आक्रमक (फॉरवर्ड) खेळाडूंचा समावेश आहे. अनुभवी ड्रॅग फ्लीकर व्ही. आर. रघुनाथ, बचावपटू कोथाजीत सिंग आणि गुरजिंदर सिंग, मध्यरक्षक एस. के. उथप्पा आणि दानिश मुज्तबा त्याचप्रमाणे स्ट्रायकर एस. व्ही. सुनील, मनदीप सिंग, तलविंदर सिंग या खेळाडूंनी संघामध्ये पुनरागमन केले आहे. नुकताच बेल्जियम येथे झालेल्या विश्व हॉकी लीग सेमीफायनल्समध्ये चौथे स्थान पटकावणाऱ्या भारतीय संघामध्ये या खेळाडूंचा समावेश नव्हता. त्याचवेळी मोहम्मद आमिर खान हा एकमेव नवा चेहरा संघात समावेश करुन घेतला आहे.त्याचवेळी मनप्रीत सिंग, धरमवीर सिंग, निकिन थिमैया, सतबीर सिंग, गुरमेल सिंग आणि युवराज वाल्मिकी या खेळाडूंना संघातून डच्चू मिळाला आहे. तसेच हॉकी इंडियाच्या विशेष समितीने सिनियर मिडफिल्डर गुरबाज सिंग विरुद्ध गैरवर्तणुकीबाबत कारवाईची मागणी केली असून त्याचा देखील संघात समावेश नाही. दरम्यान, या दौऱ्यातील भारताचा पहिला सामना फ्रान्स विरुध्द होईल आणि या दौऱ्यासाठी आम्ही पुर्णपणे सज्ज असून नक्कीच यशस्वी कामगिरी करु असा विश्वास प्रशिक्षक रोलँट ओल्टमेन्स यांनी व्यक्त केला. (वृत्तसंस्था)भारतीय संघ : सरदार सिंग (कर्णधार), चिंग्लेनसाना सिंग, एस. के. उथप्पा, सतबीर सिंग, दानिश मुज्तबा, देवींदर वाल्मिकी (सर्व मध्यरक्षक), पी. आर. श्रीजेश (उपकर्णधार), हरज्योज सिंग (गोलरक्षक), बीरेंद्र लाकडा, कोथाजीत सिंग, व्ही. आर. रघुनाथ, जसजीत सिंग, रुपींदर पाल सिंग, गरजिंदर सिंग (सर्व संरक्षक), एस. व्ही. सुनील, रमनदीप सिंग, आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, तलविंदर सिंग, ललित उपाध्याय आणि मोहम्मद आमिर खान.ही मालिका आमच्यासाठी खुप महत्त्वाची आहे. या दौऱ्यातून विश्व हॉकी लीग फायनलसाठी आमची तयारी कितपत झाली असून अजून काय त्रूटी बाकी आहेत हे कळेल. विश्व हॉकी लीग फायनल्स नंतर आमचे लक्ष्य रिओ आॅलिम्पिककडे असेल त्यामुळेच या दौऱ्यापासून प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा असेल. या दौऱ्यासाठी आम्ही गाफील राहणार नसून दोन्ही संघ चांगले आहे. त्यांच्याविरुध्द खेळून युरोपीय परिस्थितीमध्ये खेळण्याचा अनुभव आम्हाला मिळेल.- रोलँट ओल्टमेन्सम, प्रशिक्षक भारतीय संघ
भारताचा हॉकी संघ युरोप दौऱ्यावर
By admin | Updated: July 28, 2015 01:44 IST