ताश्कंद : राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता मल्ल राजीव तोमर विश्व चॅम्पियनशिपच्या पात्रता फेरीतच गारद झाला. त्यामुळे विश्व चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत भारताची सुरुवात निराशाजनक झाली. तोमरला पुरुषांच्या १२५ किलो वजन गटात फ्रिस्टाईलच्या पात्रता फेरीत कोरियाच्या रेयोंग संगविरुद्ध १-३ ने पराभव स्वीकारावा लागला. अन्य भारतीय मल्ल अरुण याला ७0 किलो वजन गटात कॅनडाच्या क्लियोपास एनक्युबेविरुद्ध 0-४ ने पराभव पत्करावा लागला.यापूर्वी दोन भारतीय मल्ल पहिल्याच फेरीत पराभतू झाले. त्यामुळे पहिल्या दिवशी भारतीय मल्लांची कामगिरी निराशाजनक ठरली. राहुल अवारेने पात्रता फेरीत तुर्कीच्या पेकेर अहमचा ४-0 ने पराभव केला, पण पुरुषांच्या ५७ किलो वजन गटात फ्रिस्टाईच्या मुख्य स्पर्धेच्या पहिल्या फेरीत त्याला मंगोलियाच्या बेखबयार अर्देनेबातविरुद्ध १-३ ने पराभव स्वीकारावा लागला. नरेश कुमारने पात्रता फेरीत गुइना बिसाऊच्या क्विंटिनो इंटिपेविरुद्ध ५-0 ने विजय मिळविला, पण पुरुषांच्या ८६ किलो वजन गटात फ्रीस्टाईलच्या पहिल्या फेरीत त्याला क्युबाच्या रेनेरिस सलासविरुद्ध १-३ ने पराभव स्वीकारावा लागला. आशियाई स्पर्धेच्या विचार करता भारताने या स्पर्धेसाठी दुय्यम संघ पाठविला आहे. २00८ व २0१२ च्या ऑलिम्पिकमध्ये पदकांचा मानकरी ठरलेल्या सुशील कुमारने २0१६ च्या रिओ ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित करताना विश्व चॅम्पियनशिपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. (वृत्तसंस्था)
भारताची निराशाजनक सुरुवात
By admin | Updated: September 9, 2014 03:22 IST