चेन्नई : भारत ‘अ’ आणि आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघादरम्यान उद्या, बुधवारपासून खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सराव कसोटी सामन्यात सर्वांची नजर कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीवर राहणार आहे, तर यजमान संघ पहिली लढत अनिर्णीत संपल्यानंतर या लढतीत विजय मिळविण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.श्रीलंका दौऱ्यापूर्वी सामन्याचा सराव करावा, या उद्देशाने कोहलीने या लढतीत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने सोमवारी कसून सरावही केला. भारतीय संघ १२ आॅगस्टपासून श्रीलंकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. श्रीलंका आणि चेन्नईतील वातावरणामध्ये बरेच साम्य आहे.गेल्या आठवड्यात खेळल्या गेलेला पहिला अनधिकृत कसोटी सामना अनिर्णीत संपला होता. एम.ए. चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी संथ व टणक असल्यामुळे निकाल शक्य झाला नाही. भारत ‘अ’ संघाला उद्यापासून खेळल्या जाणाऱ्या लढतीत चमकदार कामगिरीची आशा आहे. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरेल, अशी आशा आहे. उभय संघाच्या कर्णधारांनी पहिल्या लढतीसाठी असलेली खेळपट्टी फलंदाजांसाठी कठिण व फिरकीपटूंसाठी अनुकूल असल्याचे म्हटले होते. गेल्या तीन दिवसांपासून मैदानातील कर्मचारी खेळपट्टीवर मेहनत घेत आहेत. पहिल्या लढतीत भारतीय फिरकीपटू प्रग्यान ओझा आणि अमित मिश्रा यांनी अनुक्रमे सहा व पाच बळी घेतले होते. सलामीवीर लोकेश राहुलने पहिल्या डावात ९६ धावा फटकावल्या होत्या. कर्णधार चेतेश्वर पुजारा, विजय शंकर अणि श्रेयस अय्यर यांचेही योगदान उपयुक्त ठरले होते. दुसऱ्या बाजूचा विचार करता आॅस्ट्रेलिया संघाची भिस्त वेगवान गोलंदाजांसह पहिल्या लढतीत ८ बळी घेणारा फिरकीपटू स्टिफन ओकिफेच्या कामगिरीवर अवलंबून आहे. कागदावर राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा भारत ‘अ’ संघ मजबूत भासत आहे. अनुभवी व युवा खेळाडूंच्या समावेशामुळे संघाचा समतोल साधल्या गेला आहे.आॅस्ट्रेलियाची गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाची बाजू दमदार आहे. त्यामुळे भारतीय संघाला या लढतीत विजय मिळविण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. पहिल्या लढतीत पहिल्या डावात आॅस्ट्रेलियाने तीन विकेट झटपट गमावल्या होत्या तर दुसऱ्या डावात त्यांना चांगल्या सुरुवातीचा लाभ घेता आला नाही. आॅस्ट्रेलियाचा कर्णधार उस्मान ख्वाजाने वेगवान गोलंदाजांचा योग्य वापर केला नाही. खाद्यांच्या दुखापतीतून सावरलेला फिरकीपटू एश्टोन एगर या लढतीत निवडसाठी उपलब्ध राहिल. (वृत्तसंस्था)
भारत-आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघांत आज लढत
By admin | Updated: July 29, 2015 02:36 IST