नवी दिल्ली : पुढील वर्षी आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वन-डे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत, आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत, असे मत आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी व्यक्त केले आहे़ चॅपेल म्हणाले, आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी या संघांची तयारी अंतिम टप्प्यात आहे़ इतर संघांच्या तुलनेत भारत, आॅस्ट्रेलिया आणि आफ्रिका या संघांनी खेळाच्या प्रत्येक विभागांत सुधारणा केली आहे़ या तिन्ही संघांपैकी कोणताही संघ विश्व चॅम्पियन बनू शकतो़ विशेष म्हणजे या विजयात संघाच्या कर्णधाराची भूमिका महत्त्वाची असेल, असेही त्यांनी सांगितले़ चॅपेल यांनी पुढे सांगितले की, वेस्ट इंडीज संघ छुपा रुस्तुम आहे़ हा संघ कधीही फॉर्मात येतो; मात्र त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखता येत नाही़ दुसरीकडे इंग्लंडला स्पर्धेत मोठी मजल मारायची असेल, तर कर्णधाराला विशेष कामगिरी करावी लागेल़ मात्र, सध्या ज्या प्रकारे हा संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळ करीत आहे, त्यावरून हा संघ विश्वचषकमध्ये कमाल करील असे वाटत नाही़ आॅस्ट्रेलिया संघात डेव्हिड वॉर्नर, एरोन फिंच, शेन वॉटसन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेलसारखे स्टार खेळाडू आहेत़ संघातील मायकल क्लार्कच्याही कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे़ या खेळाडूंच्या बळावर संघ मायदेशात उत्कृष्ट कामगिरी करू शकतो़ आफ्रिकेबद्दल चॅपेल म्हणाले, हा संघ मजबूत आहे; मात्र त्यांना नक्कीच अनुभवी जॅक कॅलिसची उणीव जाणवेल; मात्र असे असले तरी ए. बी.डिव्हिलियर्स, हाशिम आमला, फाफ डुप्लेसिस तसेच गोलंदाजीत डेल स्टेन, मोर्ने मोर्केल, वायने पार्नेल उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम आहेत़ (वृत्तसंस्था)
भारत, आॅस्ट्रेलिया विजेतेपदाचे दावेदार
By admin | Updated: September 8, 2014 03:51 IST