नागपूर : ‘मल्ल तितुका मेळवावा, मल्ल धर्म वाढवावा’ हे ब्रीद कुस्तीच्या विकासासाठी आणि मल्लांना स्फुरण चढण्यासाठी नेहमी वापरले जाते. या म्हणीचा अर्थ मात्र आचरणात येताना दिसत नाही. कुस्तीचे संघटक आणि आयोजक एकसंध नसल्याने शिस्त हा प्रकार अभावानेच दिसतो. शिस्त नसेल तर खेळ वाढेल कसा?नागपुरात संपलेल्या ५९व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. मातीवरची कुस्ती मॅटवर, नियम बदलले; पण आचरणात आणावयाच्या काही गोष्टी बदललेल्या नाहीत. महाराष्ट्राच्या मल्लांकडून आॅलिम्पिकमध्ये कुस्तीचे पदक मिळविण्याची आशा वेळोवेळी धरली जाते. हे मल्ल आॅलिम्पिकचा पल्ला गाठावेत, यासाठी राजाश्रयाची मागणी राजदरबारी केली जाते. सरकारकडून कुस्तीला ज्या प्रकारे सहकार्य मिळावे ते मिळायला उशीर होत आहे हे खरे; पण आपल्यात काही उणिवा आहेत आणि त्या आपणच दूर करू शकतो, हे शहाणपण कुस्ती चालविणाऱ्यांनी का शिकू नये? जुना इतिहास आठवत पुढे जाणे हे क्रमप्राप्त असले तरी नवा इतिहास घडविण्यासाठी मल्लांना शिस्त लावणे आवश्यक आहे. महाराष्ट्र केसरीसारख्या स्पर्धेत शिस्तीचा अभाव वर्षानुवर्षे कायम आहे. स्पर्धा आली की उणिवांवर मीडियातून टीका होते. ही टीका सकारात्मक घेऊन पुढच्या वर्षी चुका सुधारण्यावर मात्र भर दिला जात नाही.नागपुरातही हेच घडले. कुस्तीत डोपिंगची मागणी जुनी आहे. त्यावर कुणी विचार करीत नाही. खर्चिक काम असल्याचे सांगून त्याकडे डोळेझाक केली जाते. नागपुरात दोन मल्ल इंजेक्शन घेताना पकडण्यात आल्याचे वृत्त धडकल्याने कुस्तीत असेच घडत असावे, असा क्रीडाप्रेमींचा समज झाला. हा समज खोटा ठरविण्यासाठी कुस्ती आयोजकांनी कायम उपाययोजना करण्याची गरज आहे. कुस्तीच्या हौदाभोवताल नको तितकी गर्दी होत होते. आॅलिम्पिक कुस्तीत मल्लासोबत केवळ कोच येतो. हीच बाब राज्य कुस्तीतही का लागू होऊ नये. पाठीराख्यांचा हौदात होणारा गोंधळ, त्यातून घडणारे हाणामारीचे प्रकार टाळता येऊ शकतील. अधिकाऱ्यांच्याच उपस्थितीत कुस्ती झाल्यास मल्लांना शिस्त लागेल.एकाच वेळी ध्वनिक्षेपकावरून वेगवगळ्या घोषणा होतात. पुकारा होऊनही मल्ल हौदात पोहोचत नाहीत. मल्ल आणि त्यांचे वजनगट, जिल्हा, पूर्व इतिहास ही माहिती मीडियाला कधीच दिली जात नाही. मोक्याच्या लढतीत मल्ल गैरहजर असणे, हे आयोजकांचे अपयशच. कुस्ती शिस्तप्रिय करण्यासाठी कुस्तीगीर परिषदेने स्वत:ला शिस्त लावणे काळाची गरज आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
कुस्तीत शिस्त नसेल तर खेळ वाढेल कसा?
By admin | Updated: January 12, 2016 04:45 IST