ऑनलाइन टीम
रिओ दी जानेरो, दि. ४- फिफा विश्वचषकातील उपांत्यपूर्व सामन्यात मॅट्स हमेल्सने १३ मिनीटाला मारलेल्या गोलमुळे जर्मनीने फ्रान्सवर मात करत सेमी फायनलमध्ये धडक दिली. जर्मनीचा गोलकिपर न्यूअरच्या भक्कम तटबंदीमुळे फ्रान्सच्या आघाडीवीरांना गोल करता आला नाही.
उपांत्यपूर्व सामन्यात शुक्रवारी जर्मनी विरुद्ध फ्रान्स हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने सामने होते. प्रशिक्षक जोकिम लोऊ यांच्या निर्णयामुळे टीकेचे धनी ठरलेला जर्मनी आणि प्राथमिक फेरीत चमकदार कामगिरी करणारा फ्रान्स यांच्या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष होते. शुक्रवारी रिओ दी जानेरो येथील स्टेडियममध्ये हा सामना रंगला. जर्मनीच्या मॅट्स हमेल्सने १३ व्या मिनीटाला हेडरद्वारे सामन्यातला पहिला गोल मारुन संघांला विजयी आघाडी मिळवून दिली. यानंतर फ्रान्सच्या आघाडीच्या फळीनेही गोल करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र जर्मनीचा गोलकिपर न्यूअरने दोन उत्तम सेव्ह करुन संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. हमेल्सला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. याविजयासह जर्मनीने उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला.१० वर्षांनी पुन्हा एकदा विश्वचषक पटकवण्याचे फ्रान्सचे स्वप्न या पराभवामुळे भंगले आहे.