कार्डिफ : नव्या वादामुळे चर्चेत असलेल्या भारतीय संघापुढे बुधवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वन-डे सामन्यात मैदानावरील कामगिरीमुळे चर्चेत राहण्याचे आव्हान आहे. ब्रिस्टलमधील पहिल्या वन-डे सामन्यावर पावसाने पाणी फेरल्यानंतर, टीम इंडिया उद्याच्या लढतीत वर्चस्व गाजविण्यास प्रयत्नशील आहे. गेल्या काही वर्षांत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची वन-डे क्रिकेटमधील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांची पाठराखण करणाऱ्या वक्तव्यामुळे बीसीसीआयच्या कर्त्याधर्त्यांना नाराज करणारा कर्णधार धोनी आता खेळावर लक्ष केंद्रित करण्यास प्रयत्नशील आहे. कर्णधार धोनीने आपले मत ठामपणे मांडणे, या दौऱ्याची विशेषता ठरली आहे. कसोटी मालिकेत रवींद्र जडेजा-जेम्स अॅन्डरसन प्रकरणामध्ये याची प्रचिती आली. पराभवानंतरही कर्णधारपदाची जबाबदारी योग्यपणे सांभाळली असल्याचे संकेत धोनीच्या वक्तव्यातून मिळाले.धोनी व बोर्डादरम्यान तिसऱ्यांदा वाद निर्माण झालेला असून, याचा प्रभाव सामन्याच्या निकालावर पडू नये, अशी चाहत्यांना आशा आहे. कसोटी मालिकेत अपयशी ठरलेल्या भारतीय फलंदाजांवर वन-डे क्रिकेटमध्ये छाप सोडण्याचे आव्हान आहे. धोनी, रोहित शर्मा आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी नेटस्मध्ये कसून सराव केला. दुर्दैवाने भारताला ब्रिस्टलच्या छोट्या मैदानावर खेळण्याची संधी मिळाली नाही. पहिल्या लढतीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत धोनीने भूमिका स्पष्ट केली नसली, तरी रोहित शर्माने सलामीवीर म्हणून चांगली भूमिका बजावली असल्याचे सांगताना रोहित सलामीला खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत. मिडलसेक्सविरुद्ध सराव सामन्यात धवनसोबत डावाची सुरुवात करणाऱ्या रोहितचा संघातील समावेश जवळजवळ निश्चित आहे. रविवारी त्याने नेटमध्ये कसून सराव केला. शास्त्रीने धवन व कोहली यांच्यासोबत प्रदीर्घ काळ चर्चा केली. दरम्यान, इंग्लंडतर्फे एलेक्स हेल्सचे खेळणे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. पहिल्या वन-डे सामन्यात त्याला संघात स्थान देण्यात आले होते. २०१५ मध्ये होणाऱ्या विश्वकप स्पर्धेचा विचार करता, त्याची निवड करण्यात आलेली आहे. (वृत्तसंस्था)
इंग्लंड-भारत आज ‘आमने-सामने’
By admin | Updated: August 27, 2014 02:16 IST