काशीलिंग आडकेप्रो कबड्डी लीगच्या निमित्ताने नवा अनुभव घेता आला. प्रत्येक विजयानंतर आनंद साजरा केला जातो तर पराभवातून काही वेगळे शिकायला मिळते. स्पर्धा अखेरच्या टप्प्यात असून, सर्वोत्तम कामगिरी करण्यावर व उर्वरित सामने जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. दबंग दिल्ली संघाने पराभव दिसत असतानाही संघर्ष करण्याची दाखविलेली जिद्द ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. आम्ही या स्पर्धेत काही लढतींमध्ये चांगली कामगिरी केली तर काही सामन्यांमध्ये पत्कराव्या लागलेल्या पराभवातून आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले. काही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघाचे संतुलन साधणे कठीण होते. माझा वैयक्तिक विचार करता मी खेळावर मेहनत घेत असून, त्यामुळे महत्त्वाच्या लढतींमध्ये शारीरिक व मानसिकदृष्ट्या सज्ज राहण्यासाठी लाभ मिळेल. आमची फॅ्रन्चायझी व संघमालक राधा कपूर यांचा मी आभारी आहे. त्यांनी माझ्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करताना निकालाची पर्वा न करता संघाचे मनोधैर्य उंचावण्यास प्राधान्य दिले. संघ व्यवस्थापन व सपोर्ट स्टाफचे सहकार्यही उल्लेखनीय ठरले. संघात सुरजीत नारवाल व जसमेर सिंग यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंकडून बरेच काही शिकायला मिळाले. या अनुभवी खेळाडूंनी आमच्यातील उणिवा दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. नारवाल सामन्यादरम्यान नेहमी आक्रमक असतो. आक्रमन व बचाव यामध्ये संतुलन कसे राखायचे, ही बाब नारवालकडून शिकायला मिळाली. चमकदार कामगिरी करून यू मुंबा व बेंगळुरू बुल्स संघाचा पराभव करण्यात यशस्वी ठरलो. (टीसीएम) (लेखक दिल्ली दबंग संघाचे खेळाडू आहेत.)
दिल्ली कामगिरी सुधारण्यास उत्सुक
By admin | Updated: August 25, 2014 02:27 IST