नवी मुंबई : पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध होत नसल्यामुळे घणसोलीतील रहिवाशी सोसायट्यांमध्ये पाणीप्रश्न पेटला आहे. प्रशासनाकडून पुरवठा होवुनही सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्या भरत नसल्यामुळे अनेक सोसायट्यांना दोन दिवसातुन एकदा पाणी पुरवठा होत आहे. परिणामी सोसायटींच्या बैठकांमध्ये पाणी चर्चेचा विषय बनला आहे.शहराला पाणी पुरवठा करणारया मोरबे धरणातच पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे प्रशासनाने पाण्याच्या वापरावर नियंत्रण आनले आहे. पाण्याचा अपव्यय टाळुन उपलब्ध पाणीसाठ्यातुन नागरिकांची तहान भागवण्याचे पुरेपूर प्रयत्न महापालिकेकडून होत आहेत. यामुळे अनेक विभागांना होणाऱ्या पाणी पुरवठ्यात प्रशासनाने कपात देखील केलेली आहे. पावसाळा सुरु होऊन मोरबे धरणात पुरेसे पाणी उपलब्ध होईपर्यंत महापालिका क्षेत्रात हीच परिस्थती कायम राहणार आहे. परिणामी गरजेपुरताही पाणी पुरवठा उपलब्ध होत नसल्यामुळे घणसोली परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. घणसोली कॉलनी परिसराला प्रशासनाकडून दुपारी सुमारे चार ते पाच तास पाणी पुरवठा होतो. यावेळी परिसरातील सोसायट्यांकडून भुमीगत टाक्यांमध्ये हे पाणी साठवुन नियोजीत वेळेप्रमाणे सकाळी रहिवाशांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र घणसोली परिसरातील अनेक रहिवाशी सोसायट्यांमध्ये १०० पेक्षा जास्त घरे असून त्यापैकी सिडको निर्मित सिम्पलेक्स वसाहतींमध्ये सुमारे १ हजार घरांच्या सोसायट्या आहेत. अशा सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्या भरण्यासाठी उपलब्ध पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. एक ते दीड महिन्यांपासून सुरु असलेली ही परिस्थिती मागील दहा दिवसांपासुन अधिकच बिकट झाली आहे. प्रशासनाकडून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे सिम्पलेक्स, घरोंदा येथील मोठ्या सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्याच पुर्णपणे भरत नाहीत. तर पाण्याच्या टाक्याच भरत नसल्यामुळे रहिवाशांना दोन दिवसातून एकदा पाणी उपलब्ध होत आहे. हे पाणी अवघे ५ ते १० मिनिटे राहत असल्यामुळे गृहिणींची तारांबळ उडत आहे. तर काहींना घरगुती वापरासाठी पाण्याच्या शोधात घराबाहेर निघावे लागत आहे.एक-दोन दिवस पाणीच मिळत नसल्यामुळे संतापलेल्या गृहिणी सोसायटी पदाधीकारयांना जाब विचारत आहेत. त्यांच्यात शाब्दीक खटके उडून सोसायट्यांच्या बैठकांमध्ये पडसाद उमटू लागले आहेत. परंतु प्रशासनाकडून परिसराला पुरेसा पाणी पुरवठा होत असून, ज्या सोसायटयांच्या भुमीगत वाहीण्यांमध्ये अडचण असेल त्यांनाच पाण्याची समस्या भेडसावत असल्याची शक्यता विभाग अधिकारी अजय गडदे यांनी सांगितले.
सोसायट्यांमध्ये पाणीप्रश्न पेटला
By admin | Updated: May 22, 2016 02:18 IST