संजय कांबळे, बिर्लागेटऐन भात कापणीच्यावेळी भात भिजल्याने आता भरडून आणलेले तांदूळ घेण्यास व्यापारी नाखूष दिसत असून तांदळासह भाताचा पेंढाही भिजल्याने कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. तर याचा परीणाम म्हणून यंदा तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.कल्याण तालुक्यात ५ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रावर भात पिक घेतले जाते. सह्याद्री, कर्जत, रत्ना, सुवर्णा, पनवेल, जया, आरपी आदी भाताच्या जातीची लागवड यंदा केली होती. आवटी, मांजर्ली, घोटसई, म्हसकळ, फळेगाव, उशीद, गेरसे, कोसले, वेहळे, पोई, दहागाव, बापसई, रायते, मानिवली, चोरे, रोहन आदी गावात मोठ्या प्रमाणात भात लागवड करण्यात आली. कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाने बियाणे, खते यांचे वाटप केले. यामुळे यावर्षी पिक चांगले आले. मात्र ऐन कापणीच्यावेळी अतिवृष्टी झाल्यामुळे कापलेले भात शेतातच भिजले. ३ ते ४ दिवस ते पाण्यात राहिल्याने त्याला कोंब येवू लागले. यातूनही शेतकऱ्यांनी कसेबसे भाताचे पेंढे बाहेर काढले व तोडणी केली.मात्र अतिवृष्टीने भिजलेले भात भरडाई करताना त्यातून अखंड तांदूळ मिळत नाही. तसेच भिजलेल्या भातापासून निघालेला तांदूळ लालसर रंगाचा होत असल्याने त्याला बाजारात गिऱ्हाईक पसंत करीत नाही. शिवाय जास्त भिजलेले भात हातात धरताच त्याचे पिठ होते. या भिजलेल्या भाताला छापलेले भात असे म्हटले जाते. प्रामुख्याने देशात सर्वात जास्त तांदूळ पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश या राज्यात उत्पादीत होतो. आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तांदळाची नवीन आवक सुरु होते. त्यापूर्वी कृषी विभागामार्फत अंदाज व्यक्त केला जातो. जून महिन्यापासून १५ सप्टेंबर पर्यंत देशात सरासरीच्या ८४ टक्के पाऊस पडला. त्यामुळे तांदळाच्या उत्पादनात घट होईल, असे कृषी विभागाला वाटते.
भात भिजल्याने व्यापारी नाखूष
By admin | Updated: December 10, 2015 01:48 IST