- अरुणकुमार मेहत्रे, कळंबोलीखांदा वसाहतीतील आदिवासी वसतिगृहात गेल्या दहा दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. काही विद्यार्थी आमरण उपोषण करीत आहेत. शनिवारी आदिवासी मंत्र्यांबरोबर विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी केवळ आश्वासने देण्यात आली, मात्र प्रत्यक्ष काहीही साध्य नसल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खांदा वसाहतीतील आदिवासी मुलांचे वसतिगृह शिक्षणाचे नाही तर आंदोलनाचे केंद्रबिंदू म्हणून ओळखले जावू लागले आहे. वसतिगृहातील सोयी-सुविधांअभावी गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. पडघे येथील वसतिगृहाकरिता पर्यायी जागा, भोजनाविषयी अडचणी, इंटरनेट सुविधा, प्रवेश, शिष्यवृत्ती, व्यायामशाळा यासारख्या काही मागण्या आहेत. तर काही विद्यार्थी जाण्या-येण्यास सोयीचे नसल्याने वसतिगृह अन्यत्र हलविण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. कळंबोलीतील आरक्षित भूखंड सिडकोने अतिक्र मणमुक्त केला असून लवकरच तो आदिवासी प्रकल्पाकडे वर्ग करण्यात येणार आहे. मात्र याठिकाणी बांधकामासाठी किमान दोन वर्षे लागण्याची शक्यता असून तोपर्यंत विद्यार्थी तडजोड करण्यास तयार नाहीत. विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू असल्याने ग्रामीण रुग्णालयाकडून चोवीस तास एक वैद्यकीय अधिकारी ठेवावा लागत आहे. त्याचबरोबर रुग्णवाहिका व इतर वैद्यकीय सुविधा पुरवावी लागत आहे. सध्या स्वाइन फ्लू, डेंग्यू, मलेरियाची साथ सुरू असून रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. मात्र एक वैद्यकीय अधिकारी वसतिगृहातच गुंतल्याने इतरांवर ताण येत आहे. शिवाय आंदोलनकर्ते याच ठिकाणी रक्त, लघवी तपासणी त्याचबरोबर सलाईन लावण्याची मागणी करीत आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांना एक प्रकारे वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे ग्रामीण रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे. हीच स्थिती पोलिसांची झाली असून, पेण प्रकल्प कार्यालयात झालेल्या तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांना विशेष खबरदारी घ्यावी लागली आहे. वसतिगृहात खांदेश्वर पोलिसांकडून बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. एकीकडे सण-उत्सव, कार्यक्र म सुरू असताना आंदोलनामुळे वसतिगृहात मनुष्यबळ खर्ची पडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असले तरी बंदोबस्त ठेवावा लागत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई यांनी सांगितले. सुकापूर येथील मुलींच्या वसतिगृहातून दररोज ७२ विद्यार्थिनी खांदा वसाहतीत मुलांच्या वसतिगृहात आंदोलनाकरिता येतात. त्या स्कूल व्हॅनमधून ये-जा करता ती वाहने कोण पुरवते, त्याची सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेते याबाबत कोणीही बोलायला तयार नाहीत. रात्री १0 वाजेपर्यंत मुली खांदा वसाहतीतील वसतिगृहात असतात, त्यांच्या सुरक्षेबाबत विचारणा केली असता, गृहपाल सीमा झोअरे यांच्याकडून ठोस उत्तर मिळाले नाही. मात्र आपण पूर्णवेळ विद्यार्थीनींबरोबस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)कारवाई नियमानुसारचपेण प्रकल्प कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कायदा हातात घेवून तडफोड करणे चुकीचे असल्याने आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांनी नियमानुसारच कारवाई केल्याने त्यांच्या बदलीचा प्रश्नच नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या प्रकल्प कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त कार्यालयाला पत्र दिले आहे. मात्र याबाबत कार्यवाही झाली नसल्याने आंदोलन सुरू आहे. आमच्या हातात काहीच नसून वरिष्ठांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे.- राजेश घरत, गृहपालप्रकल्प अधिकाऱ्याने वसतिगृहात येवून आमचे म्हणणे ऐकले नाही. आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी हेतुपुरस्सर टाळले. विद्यार्थ्यांनी कोणतीही तोडफोड केली नाही. आदिवासींवर इतक्या मोठ्या संख्येने गुन्हे दाखल करण्याकरिता राज्यपालांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र तसे झालेले नाही. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी सुध्दा केवळ आश्वासनांवर बोळवण केली आहे. - सुनील तोडवाड, विद्यार्थी
विद्यार्थ्यांची आश्वासनांवर बोळवण
By admin | Updated: September 9, 2015 00:02 IST