नामदेव मोरे, नवी मुंबई मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी नियमबाह्यपणे गाळे भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. कांदा - बटाटा, विस्तारित भाजी मार्केट व फळ मार्केटमध्येही अनेक गाळे भाड्याने दिले असून, त्याची नोंद प्रशासनाकडे नाही. गाळे भाड्याने देणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असतानाही अद्याप कोणावरही कारवाई केलेली नाही. मुंबईमधील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शासनाने कृषी मालाचा होलसेल व्यापार नवी मुंबईमध्ये स्थलांतर केला. कांदा - बटाटा, भाजी, फळ, धान्य व मसाला या वस्तूंसाठी स्वतंत्र मार्केट उभारण्यात आले आहे. व्यापाऱ्यांना बाजार समितीने गाळे उपलब्ध करून दिले आहेत. व्यापारासाठी दिलेले गाळे भाड्याने न देण्याची अट आहे. जर कोणी गाळे भाड्याने दिले तर त्यांच्यावर कारवाई करून गाळे ताब्यात घेण्याची तरतूद आहे. परंतु सर्व नियम धाब्यावर बसवून शेकडो गाळे भाड्याने दिले आहेत. कांदा-बटाटा मार्केटमध्ये जवळपास १९५ बिगरगाळाधारक व्यापारी आहेत. पूर्वी सर्वजण गाळे भाड्याने घेऊन व्यापार करीत होते. परंतु प्रशासनाने त्यांना कारवाईचा धाक दाखवून लिलावगृहामध्ये व्यापार करण्यास भाग पाडले. सर्वजण त्या ठिकाणी व्यापार करू लागले. परंतु नंतर प्रशासनाने योग्य लक्ष दिले नसल्यामुळे अनेकांनी पुन्हा गाळ्यांमध्ये व्यापार सुरू केला आहे. लिलावगृहात जवळपास २० जणच व्यापार करीत असून, इतरांनी पुन्हा गाळे भाड्याने घेतले आहेत. याचा परिणाम लिलावगृहातील व्यापारावरही होत असून, भाडेकरूंनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविल्यास जबाबदार कोणाला धरायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजी मार्केटमध्ये बिगर गाळाधारक २८५ व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र विस्तारित मार्केट बांधले आहेत. सर्वांना कमी किमतीमध्ये गाळे उपलब्ध करून दिल्यानंतरही व्यापारी नवीन मार्केटमध्ये गेलेच नाहीत. सर्वांनी गाळे निर्यातदारांना भाड्याने देऊन पुन्हा जुन्या मार्केटमध्ये व्यापार सुरू केला आहे. फळ मार्केटमध्येही एकाच गाळ्यात अनेक जण व्यापार करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. बाजार समिती नियमाप्रमाणे ज्यांना गाळे दिले आहेत त्यांनीच त्या ठिकाणी व्यापार केला पाहिजे. परंतु सद्य:स्थितीमध्ये शेकडो गाळे भाड्याने दिले आहेत. संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे. परंतु प्रशासन काहीच कारवाई करीत नाही. यामुळे गाळे भाड्याने देण्याचा व्यवसाय तेजीत आहे. गाळे भाड्याने दिल्याची कोणतीही नोंद ठेवली जात नाही. प्ा्रशासनाने व्यवसाय न करणाऱ्यांचे गाळे ताब्यात घ्यावेत व जे खरोखर व्यापार करतात त्यांना त्यांचे वितरण करावे, अशी मागणी केली जात आहे. कांदा मार्केटमध्ये नोटीस कांदा-बटाटा मार्केटमध्ये गाळे भाड्याने देणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. बिगर गाळाधारकांसाठी लिलावगृहामध्ये जागा दिली असून, त्यांनी त्याच ठिकाणी व्यवसाय करावा, असे सूचित केले आहे. यापुढेही गाळे भाड्याने दिल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन खरोखर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
बाजार समितीचे भाडेकरूंना अभय
By admin | Updated: October 13, 2015 02:17 IST