नवी मुंबई : विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने विशेष उपक्रम राबविला जाणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बुध्द्यांक वाढावा या दृष्टीने प्रयत्न केला जाणार असून त्यासाठी खास मूल्यांकन केले जाणार असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. ज्या मुलांची शैक्षणिक पात्रता इतर विद्यार्थ्यांपेक्षा कमकुवत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. प्रश्नपत्रिका कशी तयार करावी, प्रश्नांची आखणी कशी करावी, प्रश्नांचे स्वरूप,चाचणी परीक्षेची उजळणी कशी करावी या संदर्भात सोमवारी महानगरपालिकेतील पहिली ते आठवीच्या शिक्षक, मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आाले. २२ जून रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जाणार आहे. या संकल्पनेनुसार मुलांच्या प्रगतीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही पुढाकार घेतला असून याअंतर्गत तीन चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये सप्टेंबरमध्ये पहिली पायाभूत चाचणी, त्यानंतर प्रथम सत्र आणि मग द्वितीय सत्र अशा तीन चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या तीनही चाचण्यांमध्ये भाषा आणि गणित या दोन विषयांचा समावेश असणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शुध्दलेखन, निबंधलेखन, तसेच विद्यार्थ्यांची वैचारिक पातळी वाढविण्याचे प्रयत्न करण्यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण जाणवता कामा नये यासाठी शिक्षकांनी आपल्या शिकविण्याच्या पध्दतीत काय बदल केला पाहिजे याबाबतही महानगरपालिका शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांची क्षमता वाढविण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच शाळांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जाणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांची क्षमता जाणून घेतली जाणार असून अभ्यासात कमकुवत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी मनपाचा उपक्रम
By admin | Updated: September 1, 2015 04:43 IST