सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई अल्प उत्पन्न गटासाठी सिडकोने घणसोली येथे विकसित केलेल्या सिम्प्लेक्स वसाहतीची अवघ्या १० वर्षांत दुरवस्था झाली आहे. छताला तडे गेल्यामुळे घरोघरी पाणी ठिबकत आहे. तर नियोजनातील त्रुटीमुळे मलनिस्सारण वाहिन्याही सातत्याने तुंबण्याचे प्रकार घडत आहेत.सिडकोने अल्प उत्पन्न गटाच्या नागरिकांसह माथाडी कामगारांसाठी घणसोली येथे सिम्प्लेक्स वसाहत उभारलेली आहे. हा प्रकल्प सिडकोच्या प्रतिष्ठेत भर टाकणारा ठरल्याचा सिडकोचा विश्वास आहे. प्रत्यक्षात मात्र अवघ्या १० वर्षांत त्या वसाहतीची दुरवस्था झाली असून, सद्य:स्थितीला घरोघरी छतामधून पाणी ठिबकत असल्याचे पाहायला मिळत आहे. पाच सोसायटींच्या या वसाहतीमध्ये ३,१६८ घरे, तर ९६ व्यावसायिक गाळे आहेत. घराच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी सिडकोने किफायतशीर किमतीचा हा गृहप्रकल्प राबवला होता. त्याकरिता मलेशियातील लयवॉन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला. परंतु अवघ्या काही वर्षांतच हे विदेशी तंत्रज्ञान फेल ठरल्याचे त्या ठिकाणी दिसून आलेले आहे. घरांची रचनापद्धती कोंडवाड्यासारखी असल्यामुळे अनेकांनी कुटुंबाचा विस्तार होताच त्या ठिकाणावरून स्वत:ची सुटका करून घेतलेली आहे. तर उर्वरित रहिवासी समस्यांचा सामना करीत त्या ठिकाणी जीवन जगत आहेत. मयवॉन तंत्रज्ञानाच्या आधारे उभारलेल्या या वसाहतीमधील घरांचा ताबा दिल्यानंतर सिडकोने त्याकडे पाहिलेले देखील नाही.सन २००४ च्या दरम्यान या घरांचा ताबा घरमालकांकडे देण्यात आला. त्यानंतर अवघ्या ८ ते १० वर्षांतच त्या वसाहतींची दुरवस्था होऊन ठिकठिकाणी भिंतीला तडे गेल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वाधिक तडे छताला गेलेले असल्यामुळे पावसाळ्यात रहिवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. छतावर पडलेल्या भेगांमध्ये घुसलेले पाणी तिसऱ्या मजल्यावरील घरांमध्ये ठिबकत आहे. यामुळे संपूर्ण मजल्यावरील रहिवाशांना ज्या ठिकाणी पाणी ठिबकत आहे, त्या ठिकाणी भांडी मांडून त्यामध्ये पाणी साठवावे लागत आहे. त्याशिवाय अधिक पर्जन्यवृष्टी झाल्यास अगदी पहिल्या मजल्यावरील घरात देखील छतामधून पाणी टबकत आहे. यावरून बांधकामाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त होत आहे. तर सिडकोच्या अल्प कालावधीत मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये लवकरच सिम्प्लेक्स वसाहतीचा समावेश होईल, अशी भीतीही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.यासंदर्भात रहिवाशांनी अनेकदा लोकप्रतिनिधी तसेच सिडकोकडे तक्रारी केलेल्या आहेत. परंतु ठिपकणाऱ्या पाण्यावर ठोस पर्याय न निघाल्यामुळे रहिवाशांनीच विविध मार्ग शोधून काढले आहेत. छतावर ज्या ठिकाणी तडा गेलेला आहे, त्या ठिकाणी सिमेंट लावून त्यावर पत्र्याचे आवरण झाकले आहे. तर यानंतरही पाणी पाझरायचे थांबलेले नाही.
सिडको वसाहतींची १९ वर्षांत दुरवस्था
By admin | Updated: July 14, 2016 02:13 IST