- नामदेव मोरे, नवी मुंबई
सिडकोचा स्मार्ट दक्षिण नवी मुंबई प्रकल्प अडगळीत टाकण्यात आला आहे. त्याचबरोबर नैना परिसरामध्ये पाच वर्षांमध्ये तीन स्मार्ट शहरे उभारण्याचे स्वप्नही भंगले आहे. नैनामधील विकासकामे जवळपास ठप्प झाली आहेत. विकास आराखड्याला अद्याप मंजुरी मिळालेली नसून बांधकाम परवानग्याही रखडविल्या जात आहेत. दक्षिण नवी मुंबई हीच देशातील पहिली स्मार्ट सिटी होणार असा दावा करणाऱ्या सिडकोच्या सर्व घोषणा हवेत विरघळून गेल्या आहेत. दक्षिण नवी मुंबईचा अॅक्शन प्लॅन व संभाव्य योजनेची माहिती पुस्तिका ४ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशित केली होती. परंतु प्रस्तावित स्मार्ट सिटीतील सर्व प्रकल्प दिलेल्या वेळेत पूर्ण करणे शक्य नसल्याने ते तात्पुरत्या स्वरूपात बाजूला ठेवले आहेत. सिडकोने दक्षिण नवी मुंबईबरोबर पुढील १५ वर्षांमध्ये नैना परिसरामधील २५६ गावांमध्ये ५६१ चौरस किलोमीटर परिसरात २३ स्मार्ट शहरे विकसित करण्याचा संकल्पही यावेळी केला होता. प्रत्येक शहरासाठी स्वतंत्र थिम निश्चित केली होती.यामध्ये एअरपोर्ट सिटी, पोर्ट सिटी, इकोटुरिझम सिटी, नॉलेज सिटी अशाप्रकारे रचना केली जाणार होती. नैनाच्या पहिल्या टप्प्यासाठी २३ गावांची निवड केली होती. येथील ३६८३ हेक्टर जमिनीवर तीन स्मार्ट शहरे पाच वर्षामध्ये विकसित केली जाणार होती. २०२१ पर्यंत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण केले जाणार होते. परंतु प्रत्यक्षात या परिसराचा विकास अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. व्यावसायिकांनी २५१ प्रस्ताव सिडकोकडे सादर केले आहेत. परंतु त्यामधील जवळपास २९ प्रस्तावांनाच अद्याप मंजुरी दिलेली आहे. उर्वरित प्रस्तावांमधील त्रुटी काढून ते रखडविले जात आहेत. नवी मुंबईमध्ये विकासासाठी जमीन अत्यंत कमी शिल्लक राहिली आहे. अनेक ठिकाणी प्रति चौरस मीटर जमिनीचा दर ३ लाख रूपयांवर गेला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशी घरे नवी मुंबई व इतर सिडको कार्यक्षेत्रामध्ये मिळणार नाहीत. स्वस्त घरांसाठी नैना हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. परंतु लालफितशाहीमुळे तेथील विकासही रखडला आहे. नैनाच्या २३ गावांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत. या परिसराचा वेगाने विकास झाल्यास तेथे पाणीपुरवठा करण्याचे आव्हान सिडकोसमोर असणार आहे. या परिसरासाठीच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनांची कामे ठप्प आहेत. शासनाकडून विकास आराखड्यास मंजुरी मिळालेली नाही. यामुळेच बांधकामांना परवानगी वेळेवर दिली जात नसल्याची चर्चा आहे. पाण्याचे गणित जुळेना नैना परिसराच्या विकासामध्ये पाणी हा सुद्धा मोठा अडथळा ठरत आहे. सिडकोने केलेल्या नियोजनाप्रमाणे २०१६ अखेरपर्यंत नैना परिसरातील २३ गावांना २० एमएलडीची व भविष्यात ५२५ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. हे पाणी हेटवणे, एमजेपी व बाळगंगा धरणातून मिळविण्याची योजना होती. परंतु प्रस्तावित पाणीपुरवठा योजनांचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.शैक्षणिक व आरोग्य सुविधा नैनातील पहिल्या टप्प्यासाठी २० प्राथमिक शाळा, ६ माध्यमिक व ८ उच्च माध्यमिक शाळांची आवश्यकता आहे. २८ अंगणवाडी व ३ महाविद्यालयांची गरज आहे. नागरिकांना अत्यावश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.धीम्या गतीने विकास नैना परिसराचा विकास अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. जानेवारी २०१३ मध्ये शासनाने या परिसराच्या विकासासाठी सिडकोची नियुक्ती केली. २५६ गावांमधील ५६१ चौरस किलोमीटर परिसराचा विकास करायचा असल्याने पहिल्या टप्प्यात २३ गावांचा विकास आराखडा बनविण्याचे काम सुरू केले. विकास आराखड्याचा मसुदा शासनाकडे पाठविला आहे. परंतु अद्याप विकास आराखड्याला अंतिम मंजुरी मिळालेली नाही. व्यावसायिकांनी प्रस्ताव सादर करूनही त्यांना अत्यंत धीम्या गतीने परवानगी मिळत आहे.