नवी मुंबई : रस्त्यावर थाटल्या जाणाऱ्या गणेशोत्सव मंडपांमुळे नागरिकांची होणारी गैरसोय सोडवण्याचा प्रयत्न यंदा पोलिसांनी केला आहे. त्याकरिता रस्त्यावर मंडप थाटले जाणार नाहीत याची खबरदारी घेवून तशा सूचनाही मंडळांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काही मंडळांनी सहकार्य केले असून इतर मंडळांनाही रस्त्यावरील जागेत बदल करावा लागणार आहे.गणेशोत्सवादरम्यान रस्त्यावर मंडप थाटल्याने नागरिकांची गैरसोय होवून वाहतूक कोंडी देखील होत असते. प्रतिवर्षी होत असलेली गणेशोत्सव मंडळांची वाढ व मैदानांची कमतरता ही त्याची मुख्य कारणे आहेत. अशा अनेक कारणांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न यंदा नवी मुंबई पोलिसांनी केला आहे. त्याकरिता रस्त्यावर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना लगतच्या मोकळ्या मैदानांचा पर्याय सुचवण्यात आला आहे. अन्यथा रस्त्याचा ७५ टक्के भाग खुला राहील याची खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यावरुन वाशी सेक्टर १७ येथील प्रसिध्द गणेशोत्सव मंडळाने रस्त्यावरील जागेत बदल करून नेहमी गजबजलेल्या परिसरातला रहदारीचा मार्ग मोकळा केला आहे.शहरात इतरही ठिकाणी मुख्य रस्त्यावर मंडप बांधून गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामध्ये शहरातल्या प्रत्येक विभागासह तुर्भे, नेरुळ, घणसोली इथल्या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. तुर्भे येथे होणारा गणेशोत्सव हा ठाणे-बेलापूर या मुख्य मार्गावरच साजरा होत असतो. त्यामुळे उत्सव साजरा करताना मंडळांनी सामाजिक बांधिलकी देखील जोपासली जावी अशी पोलीस व महापालिकेची भावना आहे. याकरिता रस्त्यावर होणारा गणेशोत्सव टाळण्यासाठी त्या मंडळांना लगतच्या मैदानात परवानगी देण्याच्या सूचनाही पोलिसांतर्फे महापालिकेला करण्यात आल्या आहेत.गणेशोत्सव साजरा करताना महापालिका व पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. ही परवानगी मिळवण्यात आयोजकांची धावपळ होवू नये याकरिता पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयात ‘एक खिडकी’ संकल्पना राबवली जाणार आहे. यानंतरही विनापरवाना मंडप थाटून उत्सव साजरा करणाऱ्यांवर कारवाई होण्याची देखील शक्यता आहे. (प्रतिनिधी)
गणेशोत्सव मंडळांना मैदानांचा पर्याय
By admin | Updated: August 31, 2015 03:29 IST