आकाश गायकवाड, डोंबिवली सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच डान्स बारवरील स्थगिती उठवल्याने सुशिक्षितांचे शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवली परिसरात नव्याने काही डान्सबार पुन्हा सुरू होण्याची भीती काही स्वयंसेवी संस्था व नागरिक व्यक्त करीत आहेत. न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी पोलिसांच्या वरदहस्ताने काही डान्सबार सुरु होते. आता ते राजरोस सुरु झाले तर गुन्हेगारी वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. कल्याण पोलीस उपायुक्त परिमंडळ ३च्या हद्दीमध्ये सर्रास अनेक बारमध्ये छम छम आणि अनैतिक धंदे सुरु आहेत. पोलिसांनी आतापर्यंत त्याबाबत केवळ बघ्याचीच भूमिका घेतल्याचे दिसून आले. काही थातूरमातूर कारवाईचा अपवाद वगळता कल्याण परिमंडळ पोलिसांनी इथल्या डान्सबारला राजाश्रय दिल्याचेच आढळते. डान्सबारशी जोडलेल्या आर्थिक हितसंबंधात केवळ स्थानिक पोलिसच नव्हे तर कल्याण पोलीस उपायुक्त कार्यालय, कल्याण क्र ाईम ब्रँच, उत्पादन शुल्क विभाग हेही गुंतले असल्याचे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले.लेडीज बारसाठी मानपाडा रोड आणि मलंगगड रोड हा परिसर कुप्रसिद्ध आहे. लेडीज बार पूर्णपणे बंद केल्याचा दावा महाराष्ट्र सरकार करीत होते. परंतु कल्याण परिमंडळ- ३च्या हद्दीतील आठ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या या भागात लेडीज बार नेहमीच सुरु होते. त्याच्या जवळपास सुरु असलेल्या लॉजिंगच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.या परिसरात सुमारे ५८ लेडीज बार आहेत. मानपाडा हद्दीत सुमारे १८, कोळसेवाडी हद्दीत सुमारे ५ ते ७ , महात्मा फुले चौक ८ ते १०, बाजारपेठ सुमारे ४ ते ५ , विष्णूनगर हद्दीत ३ ते ५, रामनगर हद्दीत २ ते ४, खडकपाडा हद्दीत २ ते ३ डान्सबार आहेत. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वांत जास्त १८ बार असून मानपाडा रस्त्यावर आणखी चार नवीन बार सुरू होण्याच्या तयारीत आहेत. या बारमध्ये दररोज पैशांचा पाऊस पडत असतो.
पोलिसांच्या आशीर्वादाने डोंबिवलीत नव्याने छमछम?
By admin | Updated: December 11, 2015 01:12 IST