ऑनलाइन टीम
मद्रास, दि. ११ - भारतात बनावट कागदपत्र तयार करणा-या भामट्यांचे हात कापण्याची शिक्षा नाही हे दुर्दैवच आहे अशी खंत मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी व्यक्त केली. हे मत मांडताना न्यायाधीशांनी थेट इस्लाम देशांमधील कायद्यांचा दाखलाही दिला आहे.
मद्रास हायकोर्टात जमिनीची बनावट कागदपत्र तयार करुन जमीन हडपल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची मद्रास हायकोर्टात सुनावणी झाली. न्या. वैद्यनाथन यांनी बनावट कागदपत्र तयार करणा-यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ' इस्लामी देशांमध्ये चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये आरोपीची बोट किंवा हात कापण्याची शिक्षा ठोठावली जाते. इराणमध्येही या कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे. भारतातही बनावट कागदपत्रांद्वारे फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये बोट किंवा हात कापण्याची शिक्षा असायला हवी असे मत न्या. वैद्यनाथन यांनी मांडले आहे.
भारतात असे कठोर कायदे लागू झाल्यास अशा गंभीर स्वरुपाचे गुन्ह्यांचे प्रमाण घटू शकते असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणात निबंधक कार्यालयातील कर्मचा-यांचे आरोपींशी साटेलोटे होते व याद्वारे निष्पाप लोकांची संपत्ती लुटली जात होती असे ताशेरेही न्यायाधीशांनी ओढले आहेत.
काय होते प्रकरण
मद्रासमधीलपी. एम. एल्वारसन यांनी सैदापेट येथील जिल्हा निबंधक आणि विरुगाम्बकम येथील उपजिल्हा निबंधकांना जमिनीची कागदपत्र ताब्यात देण्याचे आदेश द्यावेत अशी याचिका हायकोर्टात केली होती. मात्र हायकोर्टात एल्वारसन यांनी बनावट कागदपत्रांद्वारे जमीन हडपल्याचे समोर आल्यावर हायकोर्टाने याचिकाकर्त्यालाच फटकारले. अशा प्रकरणात न्यायालय दुर्लक्ष करु शकत नाही असे न्यायालयाने सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे जमिनीची मालकी वी.वी. नचियप्पन यांची असूनही एल्वारसन यांनी बनावट कागदपत्रांद्वारे जमीन लाटली होती. विशेष म्हणजे या फसवणुकीतही 'न्याय' मिळावा यासाठी त्यांनी थेट हायकोर्टात याचिका दाखल करेपर्यंत मजल गाठली.