दिमापूर : बलात्काराच्या आरोपीला तुरुंगातून बाहेर काढून त्याची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेनंतर दिमापुरात लागू असलेली संचारबंदी मंगळवारी उठविण्यात आली. शहरात आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे आणि सर्वत्र शांतता असल्याचे पोलिसांनी सांगितले. तथापि इंटरनेट आणि एसएमएस सेवा मात्र अद्यापही ब्लॉक करण्यात आलेली आहे.संचारबंदी उठविल्यानंतर दुकाने व व्यापारी प्रतिष्ठाने पुन्हा सुरू झाली आणि लोकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली. शाळा, कॉलेज व कार्यालयेही उघडण्यात आल्याचे वृत्त आहे. आरोपीच्या हत्येच्या संदर्भात आतापर्यंत ४२ जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपीला संतप्त जमावाने बेदम मारहाण करून ठार केले होते आणि त्याला दुचाकीला बांधून भर रस्त्यावरून फरपटत आणले होते.(वृत्तसंस्था)
दिमापुरातील परिस्थिती पूर्वपदावर
By admin | Updated: March 10, 2015 23:25 IST