ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १४ - जम्मू काश्मीरमधील पूरग्रस्त भागात अडकलेल्या लाखो नागरिकांची सुखरुप सुटका करणा-या भारतीय सैन्याच्या जवानांच्या मदतकार्याला पाकिस्तानच्या महिला खासदाराने सलाम केला आहे. पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी भारतीय सैन्याचे जवान अथक मेहनत घेत असून त्यांच्या या कामाचे कौतूक केलेच पाहिजे अशा शब्दात पाकिस्तानच्या खासदार आयेशा जावेद यांनी भारतीय जवानांची पाठ थोपटली आहे.
पाकिस्तानमधील पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाच्या खासदार आयेशा जावेद यांच्या नेतृत्वाखालील पाकचे शिष्टमंडळ श्रीनगरमध्ये आले होते. मात्र पूरामुळे आयेशा जावेद व त्यांचे अन्य दोघे सहकारी श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये अडकले होते. भारतीय सैन्याच्या जवानांनी या शिष्टमंडळाची श्रीनगरमधील हॉटेलमधून सुटका केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आयेशा जावेद यांनी जवानांचे भरभरुन कौतुक केले. पूरामुळे आम्ही दोन दिवस श्रीनगरमधील हॉटेलमध्ये अडकलो होतो. दोन दिवसांनी भारतीय सैन्याच्या जवानांनी आमची सुखरुप सुटका केली असे आयेशा जावेद यांनी सांगितले. काश्मीरमधील अनेक भागांना पूराचा जोरदार तडाखा बसला असून आम्हाला सर्वत्र सैन्याचे जवानच मदत करताना दिसत आहे. जिल्हा प्रशासनाचे पथक आम्हाला कुठेही दिसले नाही असे जावेद यांनी निदर्शनास आणून दिले. मात्र ऐरवी भारतावर टीका करणारे पाकमधील नेते आता भारतीय जवानांचे कौतुक करतानाचे चित्र समोर आले आहे.