ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - लहानपणी मुलांनी मस्ती केलीच पाहिजे असे सांगताना मुलांचं लहानपण संपतंय ते लवकरात लवकर मोठे होतायत की काय असं वाटतंय असा खेद पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला. मुलांचं बालपण दीर्घकाळ राहिलं पाहिजे, त्यांनी दंगामस्ती करत मोठं व्हायला हवं असं सांगताना मोदींनी आपल्या बालपणीच्या शरारतीच्या आठवणी सांगितल्या. दिल्लीतल्या मुलांबरोबरच व्हिडीयो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी लेह, भूज, दांतेवाडा, इंफाळ अशा देशभरातल्या विविध मुलांशी संवाद साधला. मुलांशी त्यांच्या हितगुजाच्या गप्पा करत त्यांनी मुलांची मने जिंकली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंहांचा दाखला देत नरेंद्र मोदी म्हणाले की, मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी विशेष परीश्रम घेतले असून त्यांचं अनुकरण देशानं करायला हवं. मुलींच्या शिक्षणासाठी देशपातळीवर प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करताना आपण त्या दिशेने काम करत असल्याचं मोदी म्हणाले.
मोदींच्या मुलांशी साधलेल्या संवादामधले ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे:
- विद्यार्थ्यांकडे फक्त पदवी असून उपयोग नाही, काहीतरी कौशल्य असणेही महत्वाचे असते.
- राजकारणाकडे प्रोफेशन म्हणून पाहू नका, ती एक सेवा आहे. माझ्यासाठी राजकारण ही सेवा आहे आणि सव्वाशे कोटी भारतीय हा माझा परिवार.
- आपण निसर्गाच्या सानिध्यात राहणे सोडून दिले आहे. चांदण्या रात्री रस्त्यावरील दिवे बंद ठेवा, ती पर्यावरणाची सेवा आहे.
- पर्यावरण बदलले नाही, आपण बदललो आहोत. आपण निसर्गावर प्रेम केले पाहिजे.
- चांगले आचरण हीसुद्धा एकप्रकारे देशसेवाच असते. वीज वाचवणे, झाडे लावणे ही सुद्धा देशसेवाच. चांगले विद्यार्थी घडले तर देशाचा विकास शक्य.
- शाळेत स्वच्छतागृहे नसल्याने मुली शिक्षण अर्धवट सोडून देतात.
- देशाच्या विकासासाठी मुलींना शिक्षण मिळणे अत्यंत महत्वाचे आहे. एक मुलगी शिकल्यावर दोन कुटुंब साक्षर होतात.
- आजकाल मुलांचे बालपण लवकर हरवत आहे.
- शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक दिली पाहिजे. त्यांच्यातील गुण शोधून त्यांना वाव देणं हे शिक्षकांचे काम आहे. मी शिक्षक असतो तर मी कोणत्याही विद्यार्थ्यांत भेदभाव केला नसता.
- काहीतरी बनण्यापेक्षा काहीतरी करण्याचे स्वप्न पहा.
- गुगल माहिती देऊ शकेल, ज्ञान नाही. त्यामुळे स्वत: वाचा आणि ज्ञान मिळवा.
- जपानमध्ये शिकवणं नाहीये, पण शिकणं खूप आहे, विद्यार्थी शिस्तप्रिय आहेत - पंतप्रधान मोदी.
- मी हेडमास्टर नाही पण टास्कमास्टर आहे. मी कठोर मेहनत करतो.
- अनुभव हा सर्वात चांगला शिक्षक असतो, असं म्हणतात. पण मी म्हणेन तुमचे संस्कार, शिक्षण आणि शिक्षक हेही तितकेच महत्वाचे असतात.
- आयुष्यात कितीही मोठे झालो तरी आपण सतत शिकत राहीले पाहिजे.
- जीवन में खेलखूद नही, तो जीवन खिलेगा नही.
- विद्यार्थ्यांनी वाचन केले पाहिजे, आत्मचरित्रे वाचली पाहिजेत. त्यामुळे आपण इतिहासाच्या जवळ जातो आणि सत्य जाणून घ्यायची आपली क्षमताही वाढते.
- तीव्र इच्छाशक्ती असेल तर मनुष्याला आयुष्यात पुढे जाण्यास कोणीही रोखू शकत नाही.
- शिक्षक विद्यार्थ्यांसाठी रोल मॉडेल असतात.
- जपानमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी मिळून शाळेची सफाई करतात, मग आपल्याकडे असे होताना का दिसत नाही?.
- मोदींनी दिला चीनी म्हणीचा दाखला.
- एकेकाळी शिक्षकांना जनमानसात मोठे आदराचे स्थान होते, पण आता परिस्थिती बदलली आहे.
- कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या जीवनात, यशात त्याच्या आईचे आणि शिक्षकाचे मोठे योगदान असते.
- भारत युवकांचा देश आहे, तरूणांना शिक्षक बनून चांगला समाज घडवण्याची इच्छा असली पाहिजे.
- आज ५ सप्टेंबर,शिक्षक दिन. पण ब-यांच शाळांत हा दिवस शिक्षकांच्या गौरवा पुरताच साजरा होता. पण या दिवसाचे खरे महत्व ब-याच जणांना माहीत नसते.