कुंवर-बडगुजर यांच्यात वाक्युद्ध
By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST
नाशिक : मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी श्रीमती किरण कुंवर यांच्या चौकशावर चौकशा सुरू असताना, कुंवर यांनी माध्यमांमधून विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांना विधानसभेच्या पराभवाबाबत आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला असून, बडगुजर यांनीही प्रत्युत्तर देत प्रशासनाधिकारी या माझ्या प्रचारप्रमुख नसल्याने त्यांनी माझ्या पराभवाचे चिंतन करण्यापेक्षा शाळांचा दर्जा सुधरविण्यासाठी चिंता करावी, असे म्हटले आहे.
कुंवर-बडगुजर यांच्यात वाक्युद्ध
नाशिक : मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी श्रीमती किरण कुंवर यांच्या चौकशावर चौकशा सुरू असताना, कुंवर यांनी माध्यमांमधून विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांना विधानसभेच्या पराभवाबाबत आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला असून, बडगुजर यांनीही प्रत्युत्तर देत प्रशासनाधिकारी या माझ्या प्रचारप्रमुख नसल्याने त्यांनी माझ्या पराभवाचे चिंतन करण्यापेक्षा शाळांचा दर्जा सुधरविण्यासाठी चिंता करावी, असे म्हटले आहे. शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी किरण कुंवर या वादग्रस्त ठरत असून, त्यांच्या कारभाराविषयी अनेक शिक्षकांसह संघटनांनी आयुक्तांसह शिक्षण संचालकांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार त्यांच्या वेगवेगळ्या स्तरावर चौकशाही सुरू आहेत. त्यातच ज्यांनी तक्रार केली त्या फुलेनगर शाळेतील एका मुख्याध्यापिकेला चौकशी सुरू असताना निलंबित करण्याचे प्रकरणही कुंवर यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या सार्या प्रकरणात विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांच्याकडून शिक्षण मंडळातील कारभार चव्हाट्यावर आणला जात असताना, कुंवर यांनी माध्यमांद्वारे बडगुजर यांच्या राजकीय वाटचालीवरच शरसंधान केले आहे. कुंवर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना बडगुजर यांनीही विधानसभा निवडणुकीत माझी पत्नी हर्षा बडगुजर व सेनेचे पदाधिकारी प्रचारप्रमुख होते. त्यामुळे पराभवाचे चिंतन करण्यास पक्ष आणि पदाधिकारी समर्थ असून, प्रशासनाधिकार्यांनी त्याची चिंता करू नये, असा टोला लगावला आहे. कुंवर आणि बडगुजर यांच्यातील वाक्युद्धाचे पडसाद आता येत्या महासभेत उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.