नवी दिल्ली : भारतीय रेल्वे लवकरच खाजगी कंपन्यांना आपल्या स्वत:च्या मालवाहू रेल्वे चालविण्याची परवानगी देणार आहे. हा निर्णय झाल्यास रेल्वे मार्गावरील सरकारची एकाधिकारशाही संपणार आहे. रेल्वेशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सिमेंट, स्टील, वाहन, पुरवठा, धान्य, रसायने आणि खते या क्षेत्रातील कंपन्यांनी विशेष मालवाहू रेल्वे वाहतूक योजने अंतर्गत आपल्या स्वत:च्या मालवाहू रेल्वे उभारण्यात रस दर्शविला आहे. खाजगी टर्मिनल वरून त्यांच्या रेल्वेंना परवानी देण्याचा विचार सुरू आहे. खाजगी टर्मिनलच्या माध्यमातून २0 ते २५ दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक क्षमता उभी केली जाऊ शकते. कोळसा वगळता इतर सर्वच वस्तूंची मागणी वाढत आहे. विविध क्षेत्रातील कंपन्यांनी पुढे येऊन आपले स्वत:चे टर्मिनल उभे करण्यासाठी गुंतवणूक करावी, अशी आमची अपेक्षा आहे. स्वत:चे टर्मिनल उभे करण्याबरोबरच ते स्वत:च्या रेल्वेही चालवू शकतील.खाजगी मालवाहू रेल्वेचा प्रयोग यशस्वी झाल्यास खाजगी प्रवासी रेल्वेलाही परवानगी दिली जाऊ शकते, असे या अधिकाऱ्याने सांगितले. टाटा स्टील, अदाणी अॅग्रो, कृभको आणि अन्य काही बड्या उद्योग समूहाचे स्वत:चे टर्मिनल सध्याही आहेत. सूत्रांनी दिेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात देशात ५५ खाजगी मालवाहू टर्मिनल उभारण्याची परवानगी देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यापोटी तब्बल ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. स्वत:चे टर्मिनल ते स्वत:ची मालवाहतूक- मालवाहू रेल्वे वाहतूक योजने अंतर्गत खाजगी कंपन्या भारतीय रेल्वेकडून रेक भाड्याने घेऊन चालवू शकतात. स्वत:चेच रेक उभारून ते स्वत:च्या सोयीनुसार चालविण्याची मुभाही त्यांना असेल. - सध्याच्या उपलब्ध रेल्वे मार्गावरून हे रेक चालविण्याची परवानी त्यांना असेल. स्वत:चे मालवाहू टर्मिनलवरून ते त्याद्वारे मालवाहतूक करू शकतील.
रेल्वे मार्गावर आता खाजगी मालगाड्या
By admin | Updated: April 12, 2017 00:21 IST