झोपेतून उठविल्याने वृद्ध पित्याचा खून
By admin | Updated: August 7, 2015 21:35 IST
मुलाला अटक : घोडेगावजवळील कोटमदरा येथील घटना
झोपेतून उठविल्याने वृद्ध पित्याचा खून
मुलाला अटक : घोडेगावजवळील कोटमदरा येथील घटना घोडेगाव : वडिलांनी झोपेतून उठवले या कारणावरून चिडून दशरथ विठ्ठल भांगे याने वडिल विठ्ठल तुकाराम भांगे (वय ८०) यांचा सुर्याने भोसकून खून केला. घोडेगाव जवळील कोटमदरा (ता. आंबेगाव) जवळ शुक्रवारी ही घटना घडली.आरोपी दशरथ विठ्ठल भांगे (वय ६०) याला पोलिसांनी अटक केली आहे़ याबाबत घोडेगाव पोलिस ठाण्यात भाऊ शंकर विठ्ठल भांगे (वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे. कोटमदरा येथे आई, वडिल, भाऊ, पत्नी व दोन मुले असे सर्व जण शेजारी शेजारी राहतात. विठ्ठल भांगे हे आज सकाळी ७ च्या सुमारास आंघोळीला जात होते़ त्यांनी जाता जाता दशरथला उठविले़ त्यामुळे चिडलेल्या दशरथने तेथील सुरा घेऊन वडिलांवर वार करण्यास सुरुवात केली़ हे पाहून त्याची पत्नी धावत आली. त्यांनी मारु नका, म्हणून दशरथला विनवणी केली. आरडाओरडा ऐकून शेजारी राहणारे शंकर भांगे धावतच तेथे आले़ दशरथ याने वडिलांच्या छातीवर सुर्याने वार करून त्यांना घराच्या मोरीत टाकले. घराच्या बाहेर लोक जमलेले पाहून दशरथ याने आमच्या मध्ये कोणी पडू नका नाही तर तुम्हाला भोसकून टाकेन, अशी धमकी दिली व घराच्या आत कडी लावून बसला. घोडेगाव पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्याला दरवाजा उघडायला लावले. त्याने दरवाजा उघडल्यानंतर घरात मोरी मध्ये वडिल विठ्ठल भांगे रक्त्याच्या थारोळयात पडले होते. पोलिसांनी दशरथला अटक केली.