हरीश गुप्ता, नवी दिल्लीजुलैच्या मध्याला होऊ घातलेल्या सहाव्या ‘ब्रिक्स’ देशांच्या (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि द़आफ्रिका) शिखर बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील वा नाही, याबाबत तूर्तास अनिश्चितता आहे़ ‘ब्रिक्स’ शिखर बैठक होणार नेमक्या त्याच काळात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ घातले आहे़ या अधिवेशनाला अनुपस्थित राहणे मोदींसाठी कठीण ठरू शकते़ अशास्थितीत या जागतिक शिखर परिषदेला अनुपस्थित राहण्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालय विचार करीत आहे़ मोदींऐवजी देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एखाद्या वरिष्ठ मंत्र्यांला या परिषदेसाठी पाठविण्याच्या पर्यायावरही विचार सुरू आहे़ यासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षित आहे़ रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन, चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तसेच परिषदेचे यजमानपद स्वीकारलेल्या ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षा डील्मा रूसेफ आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेला हजेरी लावणार आहेत़ पाच आठवड्यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मोदी सरकारसाठी महत्त्वपूर्ण आहे़ मोदी सरकारची आर्थिक दूरदृष्टी आणि कृतीयोजना यानिमित्ताने समोर येणार आहेत़ याशिवाय दुष्काळसदृश स्थिती आणि महागाई असे काही ज्वलंत प्रश्नही मोदी सरकारपुढे आ वासून उभे आहेत़ त्यांनी मोदींचे लक्ष वेधून घेतले आहे़
मोदी ‘ब्रिक्स’ ला हजेरी लावणार?
By admin | Updated: July 3, 2014 05:04 IST