स्थानिकांनी घातला पालकमंत्र्यांना घेराव
By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST
मध्यरात्री केली पोलिसांची कानउघाडणी
स्थानिकांनी घातला पालकमंत्र्यांना घेराव
मध्यरात्री केली पोलिसांची कानउघाडणीत्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळा पहिल्या शाहीस्नानाच्या पूर्वसंध्येला पोलीस प्रशासनाने त्र्यंबकेश्वर शहरातील स्थानिक दुकानदार, पौरोहित्य संघ आणि नागरिकांना पिटाळून लावत निर्मनुष्य रस्ते करण्याच्या भूमिकेमुळे संतापलेल्या त्र्यंबकेश्वरवासीयांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना त्र्यंबकेश्वरला बोलावून खडे बोल सुनावले.त्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी लगोलग पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला फटकारत स्थानिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्या, असे जाहीरपणे सांगावे लागले. त्याचीच परिणती म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन हे पहिल्या व दुसर्या आखाड्याच्या शाहीस्नानापर्यंत त्र्यंबकेश्वरमध्येच थांबून होते.पहिल्या शाहीस्नानाच्या रात्री साधारणत: अकरा वाजेपासूनच पोलिसांनी आखाड्यांच्या शाही मार्ग मिरवणुकीत थांबलेल्या स्थानिक व परराज्यीय भाविकांना शहराबाहेर पिटाळून लावण्यासाठी बळाचा वापर केल्याचे समजते. तसेच शहराच्या मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंद करण्याबरोबरच मिरवणूक मार्गातील कुटुंबीयांना घरे बंद करण्याचे फर्मान सोडल्याचे समजते. याचा परिपाक म्हणून संतापलेले त्र्यंबकेश्वरमधील दुकानदार व व्यावसायिक यांच्यासह पौरोहित्य संघाचे पदाधिकारी यांनी रात्री साडेबारा वाजता एकत्र येत पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या या दडपशाहीबाबत नाराजी व्यक्त केली. इतकेच नव्हे तर कुंभमेळामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांना नाशिकला निरोप पाठवून तातडीने बोलावून घेतले. त्यानंतर त्र्यंबकेश्वरला तातडीने पालकमंत्री गिरीश महाजन पोहोचले. नाराज त्र्यंबकवासीयांची समजूत घालून त्यांनी पोलीस व जिल्हा प्रशासनाची कानउघाडणी केल्याचे कळते. तसेच तत्काळ ध्वनिक्षेपकावरून त्र्यंबकेश्वरवासीयांना कोणताही त्रास दिला जाणार नााही, असेही जाहीर केले. त्यानंतर काहीसे वातावरण निवळले.(विशेष प्रतिनिधी)