ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - येत्या काही वर्षांमध्ये आणुऊर्जेला चालना चालना देण्यासाठी युरेनियम हे महत्त्वाचे इंधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अणुउर्जेच्या माध्यमातून ऊर्जेच्या बाबतीत मोठी भरारी मारण्याची अपेक्षा बाळगणा-या भारताने आज गुरुवारी ऑस्ट्रेलियाशी महत्त्वपूर्ण करार केला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबट व भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज दोन्ही देशांनी अणुकरारावर सह्या केल्या. भारत हा अत्यंत महत्त्वाचा सहकारी असल्याचे सांगत या करारामुळे भारताच्या शांततेसाठी अणुवापराच्या प्रयत्नांना चालना मिळणार असल्याचे अॅबट म्हणाले.
जगामध्ये ज्ञात असलेल्या युरेनियमच्या एकूण साठ्यांपैकी एक तृतीयांश साठा ऑस्ट्रेलियात आहे. भारताने जागतिक अण्वस्त्र प्रसारबंदीच्या करारावर सही करण्यास नकार दिला असल्या कारणामुळे युरेनियमच्या प्राप्तीस अडथळे येत होते. मात्र दोन वर्षांपूर्वी अमेरिकेने व ऑस्ट्रेलियाने याबाबतीत सामंजस्याची भूमिका घेत भारताला ऊर्जानिर्मितीसाठी अणू ऊर्जेचा वापर करण्यास मदत करण्याची भूमिका निश्चित केली. त्या भूमिकेचे आता करारात रुपांतर झाले असून, त्यामुळे सध्या अस्तित्त्वात असलेल्या तसेच भविष्यात उभारण्यात येणा-या अणूभट्ट्यांच्या इंधनाची सोय या करारामुळे होणार आहे.