ऑनलाइन लोकमत
हैद्राबाद, दि. ५ - इराकमध्ये जिहादची लढाई लढण्यासाठी हैद्राबादमधून चार तरूण जाणार असताना त्यांना हैद्राबाद पोलिसांनी अटक केली आहे. या चारही जणांचे वय २३ ते २५ वर्ष दरम्यान असून त्यापैकी दोघेजण इंजिनिअर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या तरूणांच्या पालकांना त्यांच्या हालचालीवरून संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत सांगितले असता हैद्राबाद पोलिसांनी त्यांना कोलकाता येथून ताब्यात घेतले आहे.
या चारही तरूणांना पोलिसांनी समजदेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. या चौघांपैकी कुणाचाही इसीस सोबत किंवा इसीसचा या चौघांसोबत कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता. फक्त सोशल मीडियावरील भडक आणि खोट्या बातम्यांनी हे तरूण जिहादसाठी जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
इराक मध्ये इसीस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया) या दहशतवादी गटाने भारतासह जगातील अनेक सुन्नी पंथाच्या तरूणांना जिहादच्या नावे चिथावणीदेत लढण्यासाठी इराकमध्ये येण्याचे आव्हान केले आहे. याकरता दहशतवादी संघटना सोशल मिडियाचा वापर करत असल्याचेही उघड झाले आहे.