चार गावांत हाणामारी, सहा जखमी ग्रामपंचायत निवडणूक : निकालानंतरचा वाद
By admin | Updated: August 7, 2015 21:35 IST
धुळे : तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लळींग, नेर व मोरशेवडी येथे विजयी उमेदवार व पराभूत उमेदवारांच्या गटांमध्ये हाणामारी झाली.
चार गावांत हाणामारी, सहा जखमी ग्रामपंचायत निवडणूक : निकालानंतरचा वाद
धुळे : तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लळींग, नेर व मोरशेवडी येथे विजयी उमेदवार व पराभूत उमेदवारांच्या गटांमध्ये हाणामारी झाली.लळींग येथे गुरुवारी दुपारी एक वाजता विजयी रॅली काढण्यावरून दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी अलका रवींद्र वाकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १३ जणांवर मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच नेर येथे निवडणुकीत पॅनलचा पराभव झाल्याचे वाईट वाटून दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी संजय नारायण कपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पाच जणांवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मोरशेवडी येथेही निवडणुकीच्या निकालावरून गुरुवारी रात्री वाद झाला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी दोन गटांत हाणामारी झाली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगविला. यासंदर्भात गुन्हा दाखल झालेला नाही. हाणामारीत पप्पू पोपट राठोड (२५), रणजीत बाबुलाल राठोड, सतनाम परशुराम तवर (३५), शांतीलाल बल्लू चव्हाण(४०) हे चार जण जखमी झाले आहेत. त्यापैकी पप्पू राठोड यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तर नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा ग्रामपंचायत निवडणुकीचा गुरुवारी निकाल जाहीर झाल्यानंतर दोन गटांत वाद होऊन झालेल्या मारहाणीत दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.सारंगखेडा ग्रामपंचायत निवडणुकीत जि. प. सदस्य जयपाल रावल यांच्या गटाने एकतर्फी विजय मिळविला. त्यानंतर विजयी गटाने गावात जल्लोष केला. विरोधी गटाच्या लोकांच्या घरासमोर फटाके फोडण्याच्या कारणावरून गुरुवारी रात्री एकास मारहाण झाली. त्याच्यावर आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. सकाळी हा प्रकार दुसर्या गटाच्या लोकांना कळल्यावर त्यांनी वाद घातला. त्यातून मारहाण झाली. दोन्ही गटांतर्फे किरकोळ दगडफेकही करण्यात आली. घटनास्थळी तातडीने सारंगखेडा पोलीस दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. शहादा पोलीस ठाण्यातून जादा कुमक व दंगा नियंत्रण पथकही गावात दाखल झाले आहे. घटनेनंतर गावात तणाव आहे. अघोषित संचारबंदीसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. (वार्ताहर)