ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १४ - बिहारमधील पूर्व चंपारण येथील एका गावातील मुलीशी बोलल्याने १४ ते १६ वर्षाच्या वयोगटातील चार मुलांना निर्वस्त्र करुन अमानूष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या चौघा मुलांची अर्धनग्न अवस्थेत गावातून धिंडही काढण्यात आली होती.
पूर्व चंपारण येथील हर्दियाबाघ गावातील चार मुलं बाखरी गावात आली होती. हे चौघे बाखरी गावातील एका अल्पवयीन मुलीशी गप्पा मारत होते. हर्दियाबाघमधील मुलांनी आपल्या गावातील मुलीशी गप्पा मारणे ग्रामस्थांना रुचले नाही व त्यांनी या चौघा मुलांना मारहाण करायला सुरुवात केली. यानंतर चौघांचेही मुंडण करुन अर्धनग्न अवस्थेत त्यांची गावातून धिंड काढण्यात आली. यावरही ग्रामस्थांचा राग शमला नाही. त्यांनी रात्रभर या चौघा मुलांना झाडाशी बांधूनही ठेवले होते. या चारही मुलांच्या पालकांनी मुलं बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली होती. पोलिस तपासात या चौघांना बाखरी गावातील ग्रामस्थांनी डांबून ठेवल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौघांचीही सुटका केली. मुलांना मारहाण झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून दोन्ही गावातील ग्रामस्थांनी एकमेकांविरोधात तक्रार दिली आहे. चौकशीनंतरच अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.