नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर बँकांमध्ये जमा झालेल्या मोठ्या रकमांचे विश्लेषण सुरू असून, या काळात तीन ते चार लाख कोटी रुपयांच्या ठेवींमध्ये करचोरी झाली असावी असा संशय व्यक्त होत आहे. नोटाबंदीनंतरच्या काळात ५०० व १००० रुपयांच्या नोटा बँकात जमा करण्यासाठी जी ५० दिवसांची मुदत देण्यात आली होती त्याच मुदतीत या रकमा जमा झाल्या आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्राप्तिकर विभागाला या मोठ्या रकमांची चौकशी करण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच तीन ते चार लाख कोटी रुपयांची रक्कम जमा करणाऱ्यांना नोटीस जारी करण्यात येणार आहे. आमच्याकडे आता सविस्तर आकडेवारी आहे. याच्या विश्लेषणातून समजते की, नोटाबंदीनंतर ६० लाख बँक खात्यांत दोन लाख कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे. या काळात एकूण ७.३४ लाख कोटी रुपयांची रक्कम बँकेत जमा करण्यात आली. या अधिकाऱ्याने असेही सांगितले की, ईशान्येकडील राज्यांमध्ये विविध बँक खात्यांत १०,७०० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. सहकारी बँकांत जमा १६ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचीही प्राप्तिकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) चौकशी करीत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)अडीच लाख भरणारेही गोत्यात?एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन ते अडीच लाख रुपये जमा करण्यात आलेल्या अशा काही खात्यांची माहिती मिळाली आहे ज्या खात्यांचे पॅन, मोबाइल नंबर व घरचा पत्ता एकच आहे. अशी रक्कम ४२ हजार कोटी रुपयांची आहे. या खात्यांचीही आयकर विभाग चौकशी करणार आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक जमा रकमेचीही चाचपणी करण्यात येणार आहे. निष्क्रिय सक्रियनोटाबंदीनंतर २५ हजार कोटी रुपये निष्क्रिय बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले. तर, ८ नोव्हेंबर २०१६नंतर ८० हजार कोटी रुपये कर्जाच्या परतफेडीच्या स्वरूपात नगदी भरण्यात आले. एकूण ६० लाख बँक खात्यांत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे. ही माहिती प्राप्तिकर विभागालाही देण्यात आली आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये जमा झालेल्या रकमेचाही तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. सहकारी बँकांत जमा झालेली १६ हजार कोटी रुपयांची माहिती आणि ग्रामीण बँकांत जमा १३ हजार कोटी रुपयांची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली आहे.
लाखो कोटींच्या ठेवींवर संशय : सरकारला करचोरीची शंका
By admin | Updated: January 11, 2017 05:22 IST