जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 06:51 IST2026-05-03T06:49:38+5:302026-05-03T06:51:26+5:30
बेपत्ता प्रवाशांच्या शोधासाठी लष्करासह एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या बोटींच्या साहाय्याने सातत्याने शोध घेत आहेत. शोधमोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.

जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
जबलपूर : जबलपूरमधील बरगी धरणात झालेल्या भीषण क्रुझ दुर्घटनेनंतर बचावकार्याचा वेग वाढवण्यात आला असून, शनिवारी सायंकाळी पाणबुड्यांना दोन बालकांचा मृतदेह शोधण्यात यश आले असून या दुर्घटनेतील मृतांची एकूण संख्या आता ११ झाली आहे.
४ वर्षीय बालकाचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. विराज सोनी असे त्याचे नाव आहे. तर त्यानंतर आणखी एका बालकाचा मृतदेह सापडला असून त्याचे नाव श्रीतमिळ (वय ५ वर्ष) असून तो खमरिया येथील वेस्टलैंड भागातील रहिवासी कमराज यांचा मुलगा होता. अद्याप दोन प्रवासी बेपत्ता असून, त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
एनडीआरएफ पाचारण
बेपत्ता प्रवाशांच्या शोधासाठी लष्करासह एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या बोटींच्या साहाय्याने सातत्याने शोध घेत आहेत. शोधमोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. सापडलेल्या दोन्ही बालकांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
रेस्क्यू ऑपरेशनमध्ये हवामानाचा अडथळा
शनिवारी सकाळपासून लष्कराचे २० पाणबुडे आणि आपत्ती निवारण दलाच्या २०० हून अधिक जवानांनी नर्मदा नदीच्या बॅकवॉटर क्षेत्रात तब्बल ५ किलोमीटरपर्यंत शोधमोहीम राबवली. मात्र, दुपारनंतर हवामानात अचानक बदल झाला.
जोरदार वारे आणि वादळामुळे धरणाच्या पाण्यात उंच लाटा उसळू लागल्याने बचावकार्यात वारंवार अडथळे येत होते. प्रतिकूल हवामानामुळे पाणबुड्यांना खोल पाण्यात शोध घेणे कठीण जात असल्याचे प्रशासनाने सांगितले. गुरुवारी सायंकाळी एमपीटीडीसीची कुझ जोरदार वादळाने अनियंत्रित होऊन बुडाली होती.