60 माता बालकांच्या प्रतीक्षेत
By admin | Updated: May 11, 2014 00:35 IST
जागतिक मातृदिन : आधाराश्रमात अर्ज दाखल
60 माता बालकांच्या प्रतीक्षेत
जागतिक मातृदिन : आधाराश्रमात अर्ज दाखलनाशिक : माता होण्याचे भाग्य लाभण्यासाठी अनेक कुटुंबातील मातांनी आधाराश्रमात बालक दत्तक मिळण्यासाठी अर्ज केले असून, देशासह विदेशातील सुमारे ६० मातांना मातृत्व मिळण्याची प्रतीक्षा आहे. मातृत्व ही जगातील एक सुंदर गोष्ट आहे. प्रत्येक स्त्रीचे आई बनण्याचे स्वप्न असते. अनेक महिलांचे हे स्वप्न पूर्ण होते; परंतु काही महिलांना त्यासाठी अनेक वर्ष प्रतीक्षा करावी लागते. अनेकांना ते सुख मिळतही नाही. मग माता होण्याचा आनंद घेण्यासाठी काही महिला दत्तक बालकांचा विचार करतात. याशिवाय अनेक कुटुंबे स्वत:चे अपत्य असूनही आधाराश्रमातून बालक दत्तक घेतात. नाशिकच्या आधाराश्रमात अशीच शेकडो कुटुंबे वर्षभरात बालक दत्तक घेण्यासाठी येत असतात. त्यात शहर, जिल्हा, राज्य यांची वेस ओलांडून संपूर्ण देशासह देशाबाहेरील माताही येत असतात. यासाठी या वर्षातील काही महिन्याांपासून सुमारे ६० मातांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी सुमारे ३५ मातांना कन्या हव्या आहेत. त्यातही चार विशेष मुलांसाठीही देशाबाहेरून अर्ज आले आहेत. त्या सर्व अर्जांची प्रक्रिया सुरू असून, त्या मातांना लवकरच बालके सोपविली जातील अशी माहिती आधाराश्रमाच्या वतीने देण्यात आली. चार विशेष बालकांमध्ये थॅलेसिमिया, किडनी यासारखी गंभीर आजार असलेली बालके आहेत. त्यांच्या उपचाराचा खर्च पाहता त्यांना देशातील कुटुंब दत्तक घेण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे त्यांना देशाबाहेर दत्तक देण्याचे प्रमाण जास्त असते. अशी होते प्रक्रियाआधाराश्रमाच्या वतीने दत्तक विधानासाठी उपलब्ध असलेल्या बालकाची माहिती इंटरनेटवर दिली जाते. त्यासाठी संबंधित संस्था अथवा व्यक्ती आधाराश्रमाशी संपर्क साधतात. मग त्यावर योग्य ती कार्यवाही करून कायदेशीर सोपस्कार पार पाडले जातात मगच बालकांना दत्तक दिले जाते. मुलींना दत्तक देण्याचे प्रमाण वाढलेगेल्या काही दशकात मुलींची कमी झालेली संख्या पाहता आम्ही समाजात मुलींना दत्तक घेण्यासाठी प्रबोधन सुरू केले. त्याला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला असून, येणार्या मातांना दत्तक म्हणून मुलांऐवजी मुलीच हव्या असतात असे दिसून आले आहे. हे आमच्या सांघिक प्रयत्नाचे यश आहे. - डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे (अध्यक्ष, आधाराश्रम)