नाशिक : नाशिकमध्ये इतकी विकासकामे करूनही जर नाशिककर मतदान करणार नसतील तर कोण कशाला येथे पुन्हा येईल? असा सवाल करून नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिककरच नव्हे तर स्वपक्षातील निवडणूक इच्छुकांना पराभूत मानसिक गर्तेत लोटून निवडणुकीपूर्वीच स्वत:चा पराभवही मान्य केल्याचा अर्थ त्यातून काढला जात आहे. मुळात राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये येऊन येथील जनतेचे प्रतिनिधित्व करावे, असा आग्रह त्यांना कोणी व कधी धरल्याचे ऐकिवात नसले तरी, गेल्या महापालिका निवडणुकीदरम्यान तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका करीत, ‘एकदा सत्ता द्या, कसा सुतासारखा सरळ करतो’ अशी भीमगर्जना करणाऱ्या ठाकरे यांचे निराशाजनक वक्तव्य पाहता त्यांना पाच वर्षांनंतरही सूत सरळ करता आले नाही हेदेखील स्पष्ट झाले आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाच वर्षे केली नाहीत इतकी लोकार्पणे करण्यास सुरुवात केली व त्यासाठी खुद्द राज ठाकरे यांनाच नाशिक वाऱ्या कराव्या लागल्या आहेत. नाशिककरांनी सत्ता ताब्यात दिल्यावर मुक्कामी राहून नाशिकचा विकास करू, असे आश्वासन देणाऱ्या ठाकरे यांना सत्ताप्राप्तीनंतर नाशिककरांचा तसा विसरच पडला, त्यामुळेच की काय त्यांच्याच नावाने व करिष्म्याने निवडून आलेल्या ४० पैकी २६ नगरसेवकांनी त्यांची साथ सोडून अन्यत्र घरोबा केला. निवडणुकीच्या तोंडावर मनसेला एकामागोमाग बसत असलेल्या धक्क्यातून पक्ष कार्यकर्त्यांचे सांत्वन करण्याबरोबरच खासगी विकासकांच्या मदतीने साकारण्यात आलेल्या कामांचे लोकार्पण करण्याच्या निमित्ताने ठाकरे यांना पुन्हा नाशिकची आठवण आली. नाशिकमध्ये विकासकामे करूनही मतदार मतदान करणार नसतील तर कशाला येथे यायचे, असा प्रश्न त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना करून स्वत:च राजकीय भवितव्याविषयी साशंक असल्याचे दाखवून दिले आहे. अर्थातच ठाकरे यांनी कोणत्या एजन्सीमार्फत सर्व्हे केला की ज्योतिषाकडे हात दाखवून (तसा त्यांचा ज्योतिषावर विश्वास नसल्याचे त्यांनी जाहीर केले, परंतु हातात रंगीबेरंगी अंगठ्या कायम ठेवल्या) निष्कर्ष काढला हे समजू शकले नसले तरी, मनसेत जी थोडीफार धुगधुगी असल्याचे समजून ज्यांनी आगामी महापालिका निवडणुकीची तयारी चालविली त्यांच्या मात्र छातीत धस्स झाले. पक्षप्रमुखालाच खात्री नसेल तर उमेदवाराला ती कशी असेल असा साहजिकच पडणारा प्रश्नही त्यातून निर्माण झाला आहे. एकमात्र खरे ज्यांनी राजकीय हवा पाहून मनसेतून काढता पाय घेतला त्या पदाधिकारी व नगरसेवकांना मात्र ‘बरे झाले बाहेर पडलो’ याचा आनंद ठाकरे यांच्या उपरोक्त विधानावरून झाला आहे. परंतु जे मनसेतून गेले ते नंतर पश्चाताप करतील हे ठाकरे यांचे दुसरे विधानही काहीसे चक्रात टाकणारे असून, जर नागरिक मतदानच करणार नाही असा ठाकरे यांचा होरा असेल तर पक्ष सोडून गेलेल्यांना त्यांचा आनंद वाटावा की पश्चाताप? अर्थातच ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार पक्ष सोडणाऱ्यांना पश्चाताप होणार असेल तर त्यामागे एकतर त्यांना मनसेकडून उमेदवारी घेऊन पराभवाची चव चाखावी लागणार नाही, असे ठाकरे यांना म्हणावयाचे असेल किंवा इतकी पडझड होवूनही नाशिककर पुन्हा आपल्याच बाजूने कौल देतील, अशी भोळी आशा ठाकरे यांनी बाळगली असेल.
का आत्ताच पराभव दिसू लागला?
By admin | Updated: January 7, 2017 00:56 IST